अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबचा पहिला मुकाबला आज गुजरातशी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
पंजाब किंग्स आज मंगळवारी येथे गुजरात टायटन्सविऊद्धच्या सामन्याने हंगामाची सुऊवात करणार असून यावेळी कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएलमध्ये नेहमीच निराशाजनक कामगिरी केलेल्या पंजाबचे नशीब आपल्या नेतृत्व कौशल्याने उजळविण्याचा प्रयत्न करेल.
अय्यरने गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सना आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. चार वर्षे दिल्ली कॅपिटल्समध्ये राहून त्यांना 2020 च्या आयपीएलच्या अंतिम फेरीत नेल्यानंतर आता पंजाबची 18 वर्षांपासून चाललेली पहिल्या आयपीएल जेतेपदाची प्रतीक्षा संपविण्याचे आव्हान त्याच्यासमोर आहे. पंजाब संघ 2018 मध्ये उपांत्य फेरीत पोहोचला होता आणि 2014 मध्ये एकदा अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु अनेक संघ बदल आणि नेतृत्व बदल करूनही तसेच किंग्स इलेव्हन पंजाबपासून पंजाब किंग्स असे नाव बदलूनही गेल्या चार आवृत्त्यांमध्ये ते आघाडीच्या पाच संघांतही स्थान मिळवू शकलेले नाहीत.
तथापि, अय्यरच्या रुपाने पंजाबकडे सिद्ध नेतृत्व क्षमता असलेला कर्णधार आहे. &ंत्याला प्रशिक्षक रिकी पाँटिंगची साथ मिळेल. दुसरीकडे, भारताच्या एकदिवसीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने गुजरातचा कर्णधार म्हणून मागील वेळी कठीण हंगाम अनुभवलेला आहे. 2022 आणि 2023 मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे जेतेपद आणि उपविजेतेपद मिळवल्यानंतर 2024 मध्ये संघ आठव्या स्थानावर राहिला. गिल आणि अय्यर हे दोघेही उत्तम फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी या महिन्याच्या सुऊवातीला दुबईमध्ये झालेल्या भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी-विजेत्या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत.
अय्यर पाच सामन्यांमध्ये 243 धावा करून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, तर गिलने बांगलादेशविऊद्धच्या पहिल्या सामन्यात शतकही झळकावले आणि भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. गुजरातच्या फलंदाजीची ताकद गिल आणि इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलर यांच्याकडून मिळणाऱ्या चांगल्या सुऊवातीवर अवलंबून असेल. बटलर अलीकडच्या खराब फॉर्ममधून सावरण्याचा प्रयत्न करेल. मधल्या फळीची धुरा वेस्ट इंडिजचा शेरफेन रदरफोर्ड, साई सुदर्शन आणि मसूद शाहऊख खान यांच्याकडे असेल तसेच अष्टपैलू रशिद खान, राहुल तेवतिया, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर आणि महिपाल लोमरोर हेही चांगले योगदान देतील अशी अपेक्षा आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकावे लागल्यानंतर मोहम्मद सिराज मोठा प्रभाव पाडून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल, तर कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, दक्षिण आफ्रिकेचा गेराल्ड कोएत्झी आणि अनुभवी इशांत शर्मा गुजरातच्या वेगवान माऱ्याला अतिरिक्त ताकद देतील. त्यांच्या फिरकी विभागाचे नेतृत्व रशिद खान करेल आणि डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोर त्याला मौल्यवान साथ देईल.
दुसरीकडे, पंजाब किंग्स कर्णधार अय्यर, जोश इंग्लिस, प्रभसिमरन सिंग, मार्कस स्टोइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यावर फलंदाजीत अवलंबून असेल. त्यांच्याकडे अझमतुल्लाह उमरझाई, स्टोइनिस, मार्को जेनसेन, शशांक सिंग आणि मुशिर खान असे अष्टपैलू खेळाडूही आहेत. वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व अर्शदीप सिंग करेल, जो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकही सामना न मिळाल्याने आपले गुण दाखविण्यास उत्सुक असेल. त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजीत लॉकी फर्ग्युसन, कुलदीप सेन आणि यश ठाकूर असे पर्याय आहेत. त्यांचे लेगस्पिनर युजवेंद्र चाहल आणि डावखुरा फिरकीपटू हरप्रीत ब्रार हेही हंगाम यशसवी ठरण्याची आशा बाळगून असतील.
संघ : गुजरात जायंट्स-शुभमन गिल (कर्णधार), अनुज रावत, जोस बटलर, कुमार कुशाग्रा, शेरफेन रदरफोर्ड, साई सुदर्शन, एम. शाहऊख खान, रशिद खान, करिम जनात, महिपाल लोमरोर, ग्लेन फिलिप्स, निशांत सिंधू, मानव सुतार, राहुल तेवतिया, वॉशिंग्टन सुंदर, अर्शद खान, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कागिसो रबाडा, साई किशोर, इशांत शर्मा, जयंत यादव.
पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, पायला अविनाश, हरनूर सिंग, जोश इंग्लिस, प्रभसिमरन सिंग, विष्णू विनोद, नेहल वधेरा, अझमतुल्लाह उमरझाई, एरोन हार्डी, मार्को जनसेन, ग्लेन मॅक्सवेल, मुशिर खान, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट, युजवेंद्र चाहल, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, हरप्रीत ब्रार, कुलदीप सेन, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.