For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘केकेआर’समोर आज पंजाबचे आव्हान

06:45 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘केकेआर’समोर आज पंजाबचे आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

कोलकाता नाईट रायडर्स संघाला एका हंगामापूर्वी जेतपद मिळवून देणारा खेळाडू म्हणजे श्रेयस अय्यर आज शनिवारी ईडन गार्डन्सवर होणाऱ्या आयपीएल सामन्यात यजमानांच्या प्लेऑफ पात्रतेच्या मार्गात अडथळा निर्माण करू शकतो. कारण केकेआरचा सामना आज श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्स संघाशी होणार आहे.

अय्यर आणि रिकी पॉन्टिंग या जोडीने आठ सामन्यांत पाच विजयांसह पंजाब संघाला गुणतालिकेतील पहिल्या पाच संघांमध्ये स्थिर केले आहे. या भागीदारीमुळे अय्यरला आत्मविश्वासाने नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे आणि त्याने आतापर्यंत तीन अर्धशतकांसह 263 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, केकेआरला गती मिळविण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यांच्या नावावर आठ सामन्यांमध्ये पाच पराभव असून आणखी एक धक्का त्यांच्यासाठी प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आणखी कठीण बनवू शकतो. त्यांची वरची फळी अस्थिर असून मधल्या फळीला सातत्य दाखविता आलेले नाही आणि फिरकी मारा एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला म्हटल्या जाणाऱ्या खेळपट्टीवर कुचकामी ठरला आहे.

Advertisement

रसेल, रिंकू आणि रमणदीप हे केकेआरचे मधल्या फळीतील त्रिकूट या हंगामात अपयशी ठरले आहे. त्यामुळे संघास कॅरिबियन अष्टपैलू खेळाडू रोवमन पॉवेलला आणावे लागू शकते. केकेआरच्या फलंदाजीतील काही चमकदार पैलूंपैकी एक असलेला अंगक्रिश रघुवंशी पुन्हा एकदा कठीण टप्प्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू करेल. मात्र हे सोपे नाही, कारण त्याचा सामना अर्शदीप सिंग आणि युजवेंद्र चहलशी होईल. कर्णधार अजिंक्य रहाणेवरही लक्ष असेल, त्याने प्रसंगी डाव सावरलेला असला, तरी गती मिळवून देणे व सामना संपविणे त्याला शक्य झालेले नाही. गेल्या आठवड्यात केकेआरचा डाव 95 धावांवर संपुष्टात आणण्यात मोठी भूमिका बजावलेल्या युजवेंद्र चहलपासून त्याला सावध राहावे लागेल.

मार्को जॅनसेनने सुऊवातीला यश मिळवून दिलेले असल्याने आणि नवोदित नेहल वढेरा अंतिम टप्प्यात स्थिती चांगल्या प्रकारे हाताळत असल्याने पंजाबचा संघ  निश्चितच अधिक आत्मविश्वासाने भरलेला आणि सुव्यवस्थित दिसतो. केकेआरच्या गोलंदाजीचा विचार करता हर्षित राणाचे पंजाबचा सलामीवीर प्रियांश आर्यसोबतचे युद्ध रंगतदार ठरू शकते. केकेआर अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. उर्वरित सहा सामन्यांपैकी पाच जिंकणे त्यांना त्यासाठी पुरेसे ठरू शकते. परंतु त्याहून कमी सामने जिंकता आल्यास त्यांना इतरांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल.

संघ कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, क्विंटन डी कॉक, रहमानउल्ला गुरबाज, अंगक्रिश रघुवंशी, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, लुवनीथ सिसोदिया, वेंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, मोईन अली, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, एनरिक नॉर्टजे, वैभव अरोरा, मयंक मार्कंडे, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, सुनील नरेन, वऊण चक्रवर्ती आणि चेतन साकारिया.

पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर, हरप्रीत ब्रार, विष्णू विनोद, मार्को जॅनसेन, लॉकी फर्ग्युसन, जोश इंग्लिस, झेवियर बार्टलेट, कुलदीप सेन, पायला अविनाश, सूर्यांश शेडगे, मुशीर खान, हरनूर पन्नू, एरोन हार्डी, प्रियांश आर्य, अजमतुल्ला उमरझाई.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.