पंजाब - आरसीबीमध्ये आज शिखर लढत
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
जगातील सर्वांत मोठ्या टी-20 लीगच्या 18 व्या हंगामाच्या अंतिम फेरीत आज मंगळवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरशी पंजाब किंग्सची लढत होईल. आयपीएल चषक जिंकण्याच्या बाबतीत विराट कोहलीची जवळजवळ दोन दशकांची वेदनादायक प्रतीक्षा यावेळी संपेल की, पंजाब किंग्सला पहिल्यांदाच विजेता बनविण्याच्या श्रेयस अय्यरच्या दृढनिश्चयाशी सरशी होईल हे आज कळून चुकेल.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या शिखर सामन्यात कोहलीला पाठिंबा देण्यासाठी हजारो चाहते 18 क्रमांकाची जर्सी घालून उपस्थित राहू शकतात. एकंदरित पाहता हा कोहलीचा चौथा आयपीएल अंतिम सामना आहे. कोहलीचा या क्रिकेट मैदानावर बराच काळ झळकणार नसल्याने चाहत्यांना भावना खरोखरच अनावर होतील. कारण त्याने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि भारताची पुढील एकदिवसीय मालिकाही काही महिन्यांनी होणार आहे.
यापूर्वीच्या हंगांमांत ज्या समस्या भेडसावल्या होत्या त्या दूर करून आरसीबीने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाबचा आठ गड्यांनी पराभव करून त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कोहली (614 धावा) दरवर्षीप्रमाणे आपले योगदान देत आला असून शीर्षस्थानी धावा जमवून डावाचा पाया रचण्याचे त्याने काम केलेले आहे. परंतु आरसीबीतर्फे लक्ष वेधून घेणारा कोहली हा काही एकमेव खेळाडू नाही. फिल सॉल्ट हा भारतीय सुपरस्टारसाठी एक परिपूर्ण साथीदार ठरला असून त्याने सुरुवातीपासूनच आक्रमणाचा सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. मयंक अग्रवाल, कर्णधार रजत पाटीदार आणि जितेश शर्मा हेही फलंदाजीच्या फळीतील विश्वासू खेळाडू आहेत.
आरसीबीच्या मागील दोन सामन्यांना मुकलेला टीम डेव्हिड या सामन्यासाठी तंदुऊस्त झालेला आहे की नाही हे पाहावे लागेल. कारण शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजीच्या दृष्टीने रोमॅरियो शेफर्डसमवेत त्याची चांगली जोडी जमू शकते. कोहलीप्रमाणेच शांत आणि संयमी जोश हेझलवूड (21 बळी) हा आरसीबीच्या वाटचालीची प्रमुख शक्ती राहिलेला आहे आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडू शेवटच्या सामन्यात त्यात आणखी भर घालण्यास इच्छुक असेल.
पंजाब किंग्सचा विचार करता मुल्लानपूर येथील घरच्या मैदानावर झालेल्या दाऊण पराभवानंतर त्यांनी त्या पराभवाचा परिणाम झाल्याचे कोणतेही चिन्ह दाखवले नाही. कारण त्यांनी पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये हरवून 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. 70 सामन्यांच्या कठीण साखळी फेरीनंतर अनुक्रमे अव्वल दोन स्थानांवर राहिलेल्या पंजाब आणि आरसीबीला स्पर्धा सुरू झाल्यापासून कधीही चषक जिंकता आलेला नाही. पंजाब किंग्सने कर्णधार अय्यर आणि प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या नेतृत्वाखाली आपल्यामध्ये खळबळजनक बदल घडवून आणला आहे.
गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सना आयपीएल जिंकून दिल्यानंतर अय्यरने (603 धावा) सलग दुसऱ्या मोसमात आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश करणे त्याच्या क्षमतेबद्दल बरेच काही सांगून जाते. स्पर्धेच्या 18 वर्षांच्या इतिहासात अय्यर हा असा एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने आयपीएलच्या अंतिम फेरीत तीन वेगवेगळ्या संघांचे नेतृत्व केलेले आहे. अय्यरचा चिकाटी हा एकमेव गुण नाही. काही महिन्यांपूर्वी पंजाब किंग्सतर्फे प्रवास सुरू करताना तो जितका यशासाठी भुकेला होता तितकाच तो अजूनही आयपीएल जिंकण्यासाठी आसुसलेला आहे.
प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस, प्रियांश आर्य आणि शशांक सिंगच्या रुपाने अय्यरला संघाच्या किल्ल्याचे रक्षण करण्याच्या आणि प्रतिस्पर्ध्यांवर आक्रमण करण्याच्या दृष्टीने चांगले साथीदार लाभले आहेत. मार्को जॅनसेनशिवाय पंजाबची गोलंदाजी थोडीशी फिकी दिसत असली, तरी फलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर संपूर्ण डावात त्यांनी मुंबई इंडियन्सला नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले. युजवेंद्र चहल अजूनही हाताच्या दुखापतीशी झुंजत आहे आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये तो त्याच्या सर्वोत्तम लयीत दिसला नाही. परंतु पंजाबला तो आपल्या माजी संघाविरुद्ध जोरदार मारा करेल, अशी अपेक्षा असेल. पावसाचा व्यत्यय येण्याची कोणतीही शक्यता नसली, तरी खेळाच्या वेळेत एक अतिरिक्त तासाचा अतिरिक्त समावेश करून कालावधी 120 मिनिटांपर्यंत वाढवणे आणि राखीव दिवस ठेवणे या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.
संघ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर-रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लियाम लिव्हिंगस्टोन. कृणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मनोज भंडागे, जोश हेझलवूड, रसिक सलाम दार, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, यश दयाल.
पंजाब किंग्स-श्रेयस अय्यर (कर्णधार). नेहल वढेरा, विष्णू विनोद, जोश इंग्लिस, हरनूर पन्नू, पायला अविनाश, प्रभसिमरन सिंग, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, हरप्रीत ब्रार, अजमतुल्ला ओमरझाई, प्रियांश आर्य, एरोन हार्डी, मुशीर खान, सूर्यांश शेडगे, मिच ओवेन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, वैशाख विजयकुमार, यश ठाकूर, कुलदीप सेन, झेवियर बार्टलेट, प्रवीण दुबे, काइल जेमिसन.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.