पंजाब प्लेऑफच्या उंबरठ्यावर
राजस्थानवर अवघ्या 10 धावांनी मात : सामनावीर हरप्रीत ब्रारचे 3 बळी, वढेराचे अर्धशतक
वृत्तसंस्था/ जयपूर
येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबने राजस्थानचा 10 धावांनी पराभव केला. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत 17 गुणासह दुसरे स्थान मिळवत प्लेऑफचे तिकीटही पक्के केले आहे. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना 219 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला 210 धावापर्यंत मजल मारता आली. पंजाबच्या विजयात नेहल वधेरा आणि हरप्रीत ब्रारने सर्वात मोठे योगदान दिले. वधेराने 70 धावा केल्या आणि हरप्रीतने 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 220 धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पाचव्या षटकातच संघाचा धावसंख्या 60 धावांच्या पुढे नेला. दरम्यान, सूर्यवंशी 15 चेंडूत 40 धावा करून आऊट झाला. यशस्वी जैस्वालने मात्र अर्धशतकी खेळी साकारताना 25 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 50 धावा केल्या. अर्धशतकानंतर मात्र तो लगेचच बाद झाला. या सामन्यात संजू सॅमसनने पुनरागमन केले, पण तो फक्त 20 धावा करून आऊट झाला. रियान परागकडून मोठ्या खेळीची आवश्यकता होती, तो 13 धावांवर क्लीन बोल्ड झाला.
ध्रुव जुरेलची अर्धशतकी खेळी व्यर्थ
दुसरीकडे, ध्रुव जुरेलने किल्ला लढवताना 31 चेंडूत 3 चौकार व 4 षटकारासह 53 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. जुरेल आणि शिमरॉन हेटमायर यांच्यात 37 धावांची भागीदारी झाली, तर 11 धावा काढून हेटमायर आऊट झाला. यानंतर राजस्थानला शेवटच्या षटकात 30 धावा करायच्या होत्या. 19 व्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजी करायला आला, ज्यामध्ये त्याने फक्त 8 धावा दिल्या, ज्यामुळे सामना पंजाबच्या बाजूने फिरला. मार्को यान्सेनने शेवटचे षटक टाकले, त्याच्या पहिल्या 4 चेंडूंनंतर सामन्याचा निकाल लागला. पहिल्या दोन चेंडूंवर फक्त दोन धावा आल्या, तर पुढच्या दोन चेंडूंवर त्याने ध्रुव जुरेल आणि वानिंदू हसरंगा यांना आऊट केले. शेवटच्या 2 चेंडूंवरील दोन चौकारांचा राजस्थानला कोणताही फायदा झाला नाही. त्यांना 7 बाद 209 धावापर्यंतच मजल मारता आली. पंजाबने हा सामना 10 धावांनी जिंकत दणदणीत विजय मिळवला.
नेहाल वढेरा, शशांक सिंगची शानदार अर्धशतके
प्रारंभी, पंजाबने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर प्रियांश आर्या 9 धावा करुन माघारी परतला. मिचेल ओवेनला भोपळाही फोडता आला नाही. स्टार फलंदाज प्रभसिमरन सिंगही 21 धावा काढून बाद झाला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला नेहाल वढेरा गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने 37 चेंडूंचा सामना करत 5 चौकार आणि 5 षटकारांच्या साहाय्याने 70 धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने 30 धावा चोपल्या. शेवटी शशांक सिंगने 5 चौकार आणि 3 षटकारांच्या साहाय्याने 59 धावा केल्या. या खेळीच्या बळावर पंजाब किंग्जने 20 षटकांअखेर 5 गडी बाद 219 धावा केल्या. ओमरझाई 21 धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्ज 20 षटकांत 5 बाद 219 (नेहाल वढेरा 70, श्रेयस अय्यर 30, शशांक सिंग नाबाद 59, ओमरझाई नाबाद 21, तुषार देशपांडे 2 बळी, रियान पराग व आकाश मढेवाल प्रत्येकी एक बळी)
राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 7 बाद 209 (यशस्वी जैस्वाल 50, वैभव सुर्यवंशी 40, संजू सॅमसन 20, ध्रुव जुरेल 53, हरप्रीत ब्रार 22 धावांत 3 बळी, यान्सेन व ओमरझाई प्रत्येकी दोन बळी).
पंजाबकडून हिशोब बरोबर
पंजाबने या विजयासह राजस्थानच्या पराभवाची परभवाची परतफेड केली. राजस्थानने पंजाबला याआधी या हंगामात 5 एप्रिल रोजी 18 व्या सामन्यात 50 धावांनी पराभूत केलं होते. आता पंजाबने या पराभवाचा हिशोब चुकता केला आहे. गुणतालिकेत पंजाब 17 गुणासह दुसऱ्या स्थानी असून आरसीबीचा संघ 17 गुणासह अव्वलस्थानावर आहे. दुसरीकडे, राजस्थानचा हा दहावा पराभव ठरला. त्यांचे स्पर्धेतील आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे.