For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाब किंग्स नंबर 1!,

06:58 AM May 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
पंजाब किंग्स नंबर 1
Advertisement

मुंबईचे क्वालिफायरचे स्वप्न हुकले : आयपीएल : अखेरच्या सामन्यात मुंबईचा 7 गड्यांनी पराभव 

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

पंजाब किंग्सने सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला 7 विकेट्सने पराभूत केले. पंजाबने या विजयासह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. तसेच क्वालिफायर 1 चे तिकीटही पक्के केले. ते आता त्यांच्या घरच्या मैदानात म्हणजेच मुल्लनपूर येथे क्वालिफायर 1 चा सामना खेळताना दिसतील. मात्र, मुंबई इंडियन्सला या पराभवामुळे चौथ्या क्रमांकावरच रहावे लागले आहे. त्यामुळे त्यांना आता एलिमिनेटर सामना खेळावा लागेल. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमावत 184 धावा केल्या. यानंतर पंजाबने विजयी लक्ष्य 18.3 षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत सहज विजय मिळवला.

Advertisement

मुंबईने विजयासाठी दिलेल्या 185 धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी सुरु केली. आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात प्रभासिमरन 13 धावा करुन बाद झाला. पंजाबने आपली पहिली विकेट 34 धावांवर गमावली. यानंतर प्रियांश आर्या आणि जोश इंग्लिसने दुसऱ्या विकेटसाठी 109 धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. प्रियांश आर्याने 9 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर 62 धावा केल्या. यानंतर जोश इंग्लिसने 42 चेंडूत 9 चौकार व 3 षटकारासह 73 धावांची खेळी साकारली. ही जोडी बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरने 26 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईकडून मिचेल सँटेनरने 2 तर बुमराहने 1 गडी बाद केला.

मुंबईची क्वालिफायरची संधी हुकली

प्रारंभी, पंजाबने नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मुंबईच्या डावाची आक्रमक सुरुवात रोहित शर्मा आणि रेयान रिकेल्टन यांनी केली. मात्र, दोघेही चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. रेयान रिकल्टनने 27 धावा केल्या तर रोहित शर्मानं 24 धावांचे योगदान दिले. यानंतर सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा मुंबईसाठी दमदार कामगिरी केली, त्याने 39 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह 57 धावा केल्या. सूर्या फटकेबाजीच्या प्रयत्नात शेवटच्या षटकात बाद झाला. दरम्यान, तिलक वर्माला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, तो केवळ 1 रन करुन बाद झाला. विल जॅक्स 17 धावा करुन बाद झाला. यांनतर हार्दिक पांड्याने 26 आणि नमन धीर यांनी 20 धावा केल्याने मुंबईला 20 ओव्हरमध्ये 7 बाद 184 धावापर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून अर्शदीप सिंग, यान्सेन आणि विजयकुमारने प्रत्येकी 2 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स 20 षटकांत 7 बाद 184 (रिकेल्टन 27, रोहित शर्मा 24, सूर्यकुमार यादव 57, विल जॅक्स 17, हार्दिक पंड्या 26, नमन धीर 20, अर्शदीप सिंग, यान्सेन व विजयकुमार प्रत्येकी 2 बळी)

पंजाब किंग्स 18.3 षटकांत 3 बाद 187 (प्रियांश आर्या 62, प्रभसिमरन सिंग 13, जोस इंग्लिश 73, श्रेयस अय्यर नाबाद 26, सँटेनर 2 बळी, बुमराह 1 बळी).

 गुणतालिकेत मुंबई चौथ्या स्थानी

पंजाबने 14 सामन्यांत 19 गुणांसह गुजरातला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आणि आता ते पहिल्या किंवा दुसऱ्या स्थानावर राहतील हे निश्चित आहे. या आधारावर, संघ 29 मे रोजी पहिला क्वालिफायर सामना खेळेल, जिथे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतील. पण पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांचा सामना कोणाशी होईल हे मंगळवारी आरसीबी आणि लखनौ यांच्यातील सामन्यानंतर निश्चित होईल. जर आरसीबी जिंकले तर त्यांना पहिले किंवा दुसरे स्थान मिळेल आणि त्यांचा सामना पंजाबशी होईल. पण जर आरसीबीचा पराभव झाला किंवा सामना रद्द झाला तर गुजरात दुसऱ्या स्थानावर तर आरसीबी तिसऱ्या स्थानावर राहील आणि त्यांचा सामना मुंबईशी होईल.

Advertisement
Tags :

.