पंजाब किंग्ज गुजरात टायटन्सवर भारी
आयपीएल 2025 : श्रेयस अय्यर-शशांक सिंगची तुफानी खेळी : गुजरात 11 धावांनी पराभूत : सुदर्शन, बटलरची खेळी व्यर्थ
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सवर 11 धावांनी विजय मिळवला. श्रेयस अय्यर व शशांक सिंगच्या तुफानी खेळीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत 5 बाद 243 धावा केल्या. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला 5 बाद 232 धावापर्यंत मजल मारता आली. पंजाबने हा सामना 11 धावांनी जिंकत विजयी सलामी दिली.
पंजाबने विजयासाठी दिलेल्या 245 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने शर्थीचे प्रयत्न केले, पण त्यांना 11 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. साई सुदर्शन व कर्णधार शुभमन गिल यांनी 61 धावांची दमदार सलामी दिली. गिलने 14 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारासह 33 धावा फटकावल्या. पण आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात तो मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर साई सुदर्शन व बटलरने संघाचा डाव सावरला.
बटलर, सुदर्शनची फटकेबाजी व्यर्थ
बटलर-सुदर्शन जोडीने पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करताना 81 धावांची भागीदारी साकारली. ही जोडी मैदानात असेपर्यंत गुजरातचा संघ हा सामना सहज जिंकले असे वाटत होते, पण ही जोडी बाद झाल्यानंतर गुजरातच्या आशा संपुष्टात आल्या. सुदर्शनने 41 चेंडूत 74 धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने 5 चौकार व 6 षटकार खेचले. तर जोस बटलरने 33 चेंडूत 54 धावांची खेळी साकारली. अखेरच्या काही षटकात रुदरफोर्डने 28 चेंडूत 46 धावा करत संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, पण तो बाद झाल्यानंतर गुजरातच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. गुजरातला 20 षटकांत 5 बाद 232 धावापर्यंत मजल मारता आली. पंजाबकडून अर्शदीपने 2 गडी बाद केले.
पंजाबची विजयी सलामी
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्जने प्रभसिमरन सिंगच्या रूपात पहिली विकेट गमावली. ज्याला 5 धावा काढून कागिसो रबाडाने आऊट केले. यानंतर, आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रियांश आर्यने 23 चेंडूत तुफानी 47 धावा केल्या. या खेळीत त्याने 2 षटकार आणि 7 चौकार मारले, पण तो अर्धशतकापासून 3 धावांनी हुकला. त्याला रशीद खानने बाद केले. प्रियांश व कर्णधार श्रेयस अय्यर या दोघांत अर्धशतकी भागीदारी झाली. प्रियांश बाद झाल्यानंतर अजमतउल्लाह ओमरझाई (16) स्वस्तात बाद झाला तर आक्रमक खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला भोपळाही फोडता आला नाही. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये मॅक्सवेल खाते न उघडता बाद होण्याची ही 19 वी वेळ होती. त्याच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला, तो आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज बनला.
श्रेयसचे शतक हुकले, शशांकची फटकेबाजी
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयश अय्यरने कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी करत गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याला शशांक सिंगने दमदार साथ दिली. या दोघांनी 81 धावांची भागीदारी साकारली. श्रेयस अय्यर 42 चेंडूत 97 धावा करुन नाबाद राहिला. या खेळीत त्याने 5 चौकार व 9 षटकार लगावले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अवघ्या शशांक सिंगने 16 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारासह नाबाद 44 धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराजने टाकलेल्या शेवटच्या षटकात शशांकने 5 चौकार मारले. या षटकात एकूण 23 धावा झाल्या. पंजाब किंग्जच्या डावात एकूण 16 षटकार मारण्यात आले. श्रेयस व शशांकच्या या दमदार खेळीच्या जोरावर पंजाबने 20 षटकांत 5 गडी गमावत 243 धावा केल्या. पंजाब किंग्जची ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या ठरली. गुजरातकडून साई किशोरने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्ज 20 षटकांत 5 बाद 243 (प्रियांश आर्या 47, श्रेयस अय्यर नाबाद 97, मार्क स्टोनिस 20, शशांक सिंग नाबाद 44, साई किशोर 3 बळी)
गुजरात टायटन्स 20 षटकांत 5 बाद 232 (साई सुदर्शन 74, शुभमन गिल 33, जोस बटलर 54, रुदरफोर्ड 46, तेवतिया 6, अर्शदीप सिंग 2 बळी, यान्सेन व मॅक्सवेल प्रत्येकी एक बळी).