मुंबईला नमवत पंजाब अंतिम फेरीत
आयपीएल क्वालिफायर 2 : सामनावीर श्रेयस अय्यरचे तुफानी अर्धशतक, नेहल वढेराची फटकेबाजी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा व्यत्यय आलेल्या आयपीएलमधील क्वालिफायर 2 मध्ये सामनावीर व कर्णधार श्रेयस अय्यरची तुफानी फटकेबाजी, नेहल वढेराची त्याला मिळालेली साथ यांच्या बळावर पंजाब किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमात मुंबई इंडियन्सचा एक षटक बाकी ठेवत 5 गड्यांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. मंगळवारी 3 जून रोजी त्यांची जेतेपदासाठी आरसीबीविरुद्ध लढत होईल
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर मुंबई इंडियन्सने पंजाबसमोर विजयासाठी 204 धावांचे टार्गेट ठेवले होते. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि नमन धीर यांनी फटकेबाजी करत मुंबईला दोनशेचा टप्पा गाठून दिला. थ्यानंतर पंजाब किंग्सने 19 षटकांत 5 बाद 207 धावा जमवित अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. पंजाबची सुरुवात खराब झाली होती. प्रभसिमरन सिंग (6) व प्रियांश आर्य (20) लवकर बाद झाल्यानंतर जोश इंग्लिस 38 धावा काढून बाद झाला. श्रेयस अय्यर व नेहल वढेरा यांनी चौथ्या गड्यासाठी 84 धावांची वेगवान भागीदारी केली. नेहलने 29 चेंडूत 48 धावा फटकावल्या. शशांक सिंग 2 धावांवर धावचीत झाल्यानंतर अय्यरने तुफान टोलेबाजी करीत संघाला एक षटक बाकी ठेवत विजय मिळवून दिला. अय्यरने 41 चेंडूत नाबाद 87 धावा फटकावताना 5 चौकार आणि 8 षटकारांची बरसात केली आणि 11 वर्षांनंतर पंजाबला अंतिम फेरी गाठून दिली. तोच सामनावीराचा मानकरी ठरला. अश्वनी कुमारने 2 तर बोल्ट व हार्दिकने एकेक बळी मिळविला.
रोहित स्वस्तात बाद
प्रारंभी, या सामन्यात नाणेफेक पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे सामना सुरू होण्यास तब्बल सव्वादोन तास उशीर झाला. रात्री पावणे दहा वाजता या सामन्याला सुरुवात झाली. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईकडून सलामीला रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांनी फलंदाजी केली. पण रोहित 8 धावांवर तिसऱ्याच षटकात बाद झाला. त्याला मार्कस स्टोइनिसने विजयकुमार वैशाखच्या हातून झेलबाद केले. रोहित बाद झाल्यानंतर बेअरस्टोला तिलक वर्माने साथ दिली. बेअरस्टो आणि तिलकने मोठे फटके खेळताना अर्धशतकी भागीदारी केली. पण 7 व्या षटकात बेअरस्टोला 38 धावांवर विजयकुमारने जोस इंग्सिशच्या हातून झेलबाद केले.
तिलक-सूर्याची फटकेबाजी
त्यानंतर तिलकला सूर्यकुमार यादवची साथ मिळाली. सूर्यकुमार यादवने सुरुवातीपासून फटकेबाजी करताना तिलकसोबत 72 धावांची भागीदारी केली. पण हे दोघेही लागोपाठच्या षटकात बाद झाल्याने मुंबईला धक्का बसला. सूर्यकुमारला 14 व्या षटकात युजवेंद्र चहलने नेहल वढेराच्या हातून झेलबाद केले, तर तिलकला काइल जेमिसनने प्रियांश आर्यच्या हातून झेलबाद केले. सूर्यकुमारने 26 चेंडूत 4 चौकार आणि 4 षटकारांसह 44 धावा केल्या. तिलकने 29 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांसह 44 धावांचे योगदान दिले.
हे दोघे बाद झाल्यानंतर नमन धीरने आक्रमक खेळ केला. पण, कर्णधार हार्दिक पंड्या 15 धावांवर अझमतुल्ला ओमरझाईविरुद्ध खेळताना जॉस इंग्लिसकडे झेल देत बाद झाला. नमनलाही अझमतुल्लानेच शेवटच्या षटकात बाद केले. त्याचा झेल मार्कस स्टोइनिसने घेतला. नमनने 18 चेंडूत 7 चौकारांसह 37 धावा केल्या. हार्दिकने 13 चेंडूत 15 धावा फटकावल्या. यानंतर अखेरीस राज अंगद बावा आणि मिचेल सँटेनरने मुंबईला 200 धावांपार नेले. मुंबईने 20 षटकात 6 बाद 203 धावा केल्या. पंजाबकडून अझमतुल्ला ओमरझाईने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच काइल जेमिसन, मार्कस स्टोइनिस, विजयकुमार वैशाख आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 20 षटकांत 6 बाद 203 : रोहित 8, बेअरस्टो 24 चेंडूत 38, तिलक वर्मा 29 चेंडूत 44, सूर्यकुमार 26 चेंडूत 44, हार्दिक 13 चेंडूत 15, नमन धिर 18 चेंडूत 37, राज बावा नाबाद 8, अवांतर 9. अझमतुल्लाह 2-43, जेमीसन 1-30, स्टोइनिस 12d14, विजय कुमार 1-30, युजवेंद्र चहल 1-39.
पंजाब किंग्स 19 षटकांत 5 बाद 207 : प्रियांश आर्य 10 चेंडूत 20, प्रभसिमरन 6, इंग्लिस 21 चेंडूत 38, अय्यर 41 चेंडूत 5 चौकार, 8 षटकारांसह नाबाद 87, नेहल वढेरा 29 चेंडूत 48, अवांतर 4. अश्वनी कुमार 22d55, बोल्ट 1-38, हार्दिक 1-19.