पंजाबचा चेन्नईवर 7 गड्यांनी सहज विजय
सामनावीर हरप्रीत ब्रार : 17 धावांत 2 बळी, राहुल चहर : 16 धावांत 2 बळी
वृत्तसंस्था/ चेन्नई
किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर येथे झालेल्या सामन्यात बलाढ्या चेन्नई सुपर किंग्जचा 13 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे पंजाब संघाने स्पर्धेच्या गुणतक्यात 8 गुणासह सातवे स्थान तर चेन्नईने 10 गुणासह चौथे स्थान प्राप्त केले आहे.
कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या समयोचित अर्धशतकाच्या जोरावर बुधवारी येथे झालेल्या सामन्यात यजमान चेन्नई सुपर किंग्जने पंजाब संघाविरूध्द 7 गड्यांच्या मोबदल्यात 162 धावापर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबने 17.5 षटकात 3 बाद 163 धावा जमवित विजय नेंदविला.
पंजाबच्या डावाला डळमळीत सुरूवात झाली. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर ग्लीसनने प्रभसिमरन सिंगला गायकवाडकरवी झेलबाद केले. त्याने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. बेअरस्टो आणि रॉसो या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 6.1 षटकात 64 धावांची भागीदारी केली. शिवम दुबेने बेअरस्टोला झेलबाद केले. त्याने 30 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारासह 46 धावा जमविल्या. बेरअस्टो बाद झाल्यानंतर रॉसो आणि शशांक सिंग यांनी तिसऱ्या गड्यासाठी 30 धावांची भर घातली. 12 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रॉसो ठाकुरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 23 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 43 धावा जमविल्या. रॉसो बाद झाला त्यावेळी पंजाबला विजयासाठी 8 षटकात 50 धावांची जरूरी होती. शशांक सिंग आणि कर्णधार सॅम करन यानी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 50 धावांची भागीदारी 35 चेंडूत नोंदवून आपल्या संघाला 13 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी विजय मिळवून दिला. शशांक सिंगने 26 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 25 तर कर्णधार करणने 20 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 26 धावा जमविल्या. पंजाबला 10 अवांतर धावा मिळाल्या. पंजाबच्या डावात 5 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले.
पंजाबने पॉवरप्लेच्या 6 षटकात 52 धावा जमविताना 1 गडी गमविला. पंजाबचे अर्धशतक 35 चेंडूत, शतक 67 चेंडूत तर दीडशतक 101 चेंडूत फलकावर लागले. चेन्नईतर्फे शार्दुल ठाकुर, ग्लेसन आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
अर्धशतकी सलामी
2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील या 49 व्या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार गायकवाड आणि त्याचा साथीदार अजिंक्य रहाणे यांनी सलामीच्या गड्यासाठी 49 चेंडुत 61 धावांची भागीदारी केली. अर्षदिप सिंगच्या गोलंदाजीवर गायकवाडने स्लिपमधुन काही आकर्षक चौकार मारले. रहाणेने सॅम करणच्या एका षटकात ऑफसाईडच्या दिशेने सलग 3 चौकार ठोकले. चेन्नईने पॉवरप्लेच्या 6 षटकात 55 धावा जमविल्या. चेन्नईच्या या सलामीच्या जोडीने 35 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली.
पॉवरप्लेनंतर पंजाबच्या कर्णधाराने फिरकी गोलंदाजांना पाचारण केले आणि चेन्नईचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. अजिंक्य रहाणे हरप्रीत ब्रारच्या गोलंदाजीवर स्विपचा फटका मारण्याच्या नादात रॉसोकरवी झेलबाद झाला. त्याने 24 चेंडूत 5 चौकारासह 29 धावा जमविल्या. हरप्रित ब्रारने चेन्नईला पुढच्या चेंडूवर आणखी एक धक्का दिला. भारताच्या टी-20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात स्थान मिळविणाऱ्या शिवम दुबेला ब्रारने पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. चेन्नईने फिरकी गोलंदाजीचा समाचार घेण्यासाठी दुबेला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला होता. पण तो पुर्णपणे फसला. राहुल चहरने अष्टपैलू रवींद्र जडेजाला केवळ 2 धावावर पायचीत केले. पंजाबच्या फिरकी माऱ्यासमोर चेन्नईचा डाव कोलमडला. चेन्नईने डावातील 6 व्या ते 10 व्या षटकादरम्यान 3 गडी केवळ 16 धावात गमविले. चेन्नईने 7 ते 15 षटकांच्या दरम्यान धावांची गती 10.6 अशी राखताना केवळ 47 धावा जमविल्या होत्या. पंजाबच्या ब्रार आणि चहर या फिरकी गोलंदाजानी आपल्या एकूण 8 षटकामध्ये 33 धावात 4 गडी बाद केले. या दोन्ही गोलंदाजांच्या षटकांमध्ये एकही चौकार नोंदविला गेला नाही. त्यानंतर एकाबाजुने संघाची बाजू सावरणाऱ्या कर्णधार गायकवाडने हर्षल पटेल आणि सॅम करण यांच्या गोलंदाजीवर काही आकर्षक फटके मारून आपले अर्धशतक 44 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकविले. या स्पर्धेतील गायकवाडचे हे सलग तिसरे अर्धशतक आहे. करणच्या गोलंदाजीवर त्याने लाँगऑनच्या दिशेने षटकार खेचला. या सामन्यातील चेन्नईचा हा पहिला षटकार ठरला. करणच्या या षटकात चेन्नईने 20 धावा घेतल्या. मोईन अलीने 9 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. गायकवाड आणि मोईन अली यांनी पाचव्या गड्यासाठी 38 धावांची भागीदारी केली. धोनीने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 धावा जमविल्या. गायकवाड 18 व्या षटकात अर्षदिपच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित्त झाला. त्याने 48 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह 62 धावा जमविल्या. चेन्नईला अवांतर 18 धावा मिळाल्या.
चेन्नईच्या डावात 4 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. चेन्नईचे पहिले अर्धशतक 35 चेंडूत, शतक 89 चेंडूत तर दिडशतक 115 चेंडूत फलकावर लागले. पंजाबतर्फे हरप्रित ब्रार आणि राहुल चहल यांनी प्रत्येकी 2 तर रबाडा आणि अर्षदिप सिंग यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : चेन्नई सुपर किंग्ज 20 षटकात 7 बाद 162 (रहाणे 29, गायकवाड 62, जडेजा 2, दुबे 0, रिजवी 21, मोईन अली 15, धोनी 14, अवांतर 18, चहर 2-16, ब्रार 2-17, अर्षदिप सिंग 1-52, रबाडा 1-23). किंग्ज इलेव्हन पंजाब 17.5 षटकात 3 बाद 163 (प्रभसिमरन सिंग 13, बेअरस्टो 46, रॉसो 43, शशांक सिंग नाबाद 25, सॅम करण नाबाद 26, अवांतर 10, ठाकुर 1-48, ग्लीसन 1-30, दुबे 1-14).