For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोमांचक सामन्यात पंजाबची गुजरातवर मात

06:10 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोमांचक सामन्यात पंजाबची गुजरातवर मात
Advertisement

आयपीएल 17 : सामनावीर शशांक सिंग, आशुतोष शर्माची मॅचविनिंग खेळी : घरच्या मैदानावर गुजरात शेवटच्या षटकात पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था /अहमदाबाद

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून पराभव केला. पंजाबने गुजरातचे 200 धावांचे आव्हान 19.5 षटकात 7 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. शशांक सिंगने 29 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या. त्याला आशुतोष शर्माने 17 चेंडूत 31 धावा ठोकत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पंजाबचा हा चार सामन्यातील दुसरा विजय आहे. या विजयासह ते गुणतालिकेत पाचव्या स्थानी आले आहेत. गुजरातचा संघ सहाव्या स्थानी घसरला आहे. 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली. कर्णधार शिखर धवन काही विशेष करू शकला नाही आणि 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेश यादवने धवनला क्लीन बोल्ड केले. यानंतर जॉनी बेअरस्टो आणि प्रभसिमरन सिंगने पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. बेअरस्टोला 22 धावांवर नूर अहमदने बाद केले. प्रभसिमरनही फटकेबाजीच्या प्रयत्नात 35 धावा काढून तंबूत परतला. सॅम करन  केवळ 5 धावा करुन बाद झाला. सिकंदर रझाला आज संघात संधी देण्यात आली होती, त्याने 15 धावा केल्या.

Advertisement

शशांक, आशुतोषची फटकेबाजी, पंजाब अखेरच्या षटकांत विजयी

दरम्यान, शशांक सिंगने महत्त्वाची खेळी करत पंजाबचे आव्हान कायम ठेवले. शशांकने अर्धशतकी खेळी करुन डाव सावरला. त्याने अवघ्या 29 चेंडूत 6 चौकार व 4 षटकारासह नाबाद 61 धावांची खेळी साकारली. शेवटच्या षटकांत त्याने संघाला विजय मिळवून दिला. तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या आशुतोषने फटकेबाजी केली. त्याने 17 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. पंजाबने विजयी लक्ष्य 19.5 षटकांत पूर्ण करत रोमांचक विजयाला गवसणी घातली.

शुभमन गिलची खेळी वाया

या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार गिल आणि यष्टीरक्षक साहा यांनी 18 चेंडूत 29 धावांची भागीदारी केली. रबाडाने साहाला झेलबाद केले. त्याने 13 चेंडूत 2 चौकारासह 11 धावा जमविल्या. साहा बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या न्यूझीलंडच्या केन विल्यम्सनने गिलसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 40 धावांची भर घातली. पंजाबच्या ब्रारने विल्यम्सनला झेलबाद केले. त्याने 22 चेंडूत 4 चौकारासह 26 धावा जमविल्या. एका बाजुने गिलने फटकेबाजी करत धावांची गती वाढविली. साई सुदर्शनने आक्रमक फटकेबाजी करताना 19 चेंडूत 6 चौकारासह 33 धावा जमविताना गिलसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 32 चेंडूत 53 धावांची भागीदारी केली. विजयशंकर रबाडाच्या गोलंदाजीवर लवकर बाद झाला. त्याने 8 धावा जमविल्या. कर्णधार गिल आणि तेवातिया यांनी पाचव्या गड्यासाठी 14 चेंडूत 35 धावा झोडपल्याने गुजरातला 199 धावांपर्यंत मजल मारता आली. तेवातियाने 8 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह नाबाद 23, तर गिलने 48 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारासह नाबाद 89 धावा झोडपल्या.

संक्षिप्त धावफलक

गुजरात टायटन्स 20 षटकात 4 बाद 199 (साहा 11, शुभमन गिल नाबाद 89, विल्यम्सन 26, साई सुदर्शन 31, विजयशंकर 8, तेवातिया नाबाद 23, अवांतर 9, रबाडा 2-44, ब्रार 1-33, हर्षल पटेल 1-44)

पंजाब किंग्स 19.5 षटकांत 7 बाद 200 (जॉनी बेअरस्टो 22, प्रभसिमरन सिंग 35, शशांक सिंग नाबाद 61, आशुतोष शर्मा 31, नूर अहमद 2 बळी तर उमेश यादव, रशीद खान, मोहित शर्मा, नळकांडे प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.