पंजाबचा चंदिगडवर 8 गड्यांनी विजय
वृत्तसंस्था / चंदिगड
रणजी क्रिकेट स्पर्धेतील ब इलाइट गटातील येथे झालेल्या सामन्यात कर्णधार उदय सहारनच्या नाबाद शतकाच्या जोरावर पंजाबने चंदिगडचा 8 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात सहारनने 194 चेंडूत 15 चौकारांसह नाबाद 117 धावा झळकविल्या.
2024 साली झालेल्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वचषक युवा क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या उपविजेत्या भारतीय युवा संघाचे नेतृत्व सहारनकडे होते. रणजी सामन्यातील खेळाच्या तिसऱ्या दिवशी पंजाबला विजयासाठी 227 धावांचे आव्हान मिळाले होते. या विजयामुळे पंजाबला 6 गुण मिळाले. सहारनने चालु वर्षीच्या क्रिकेट हंगामात आपले प्रथमश्रेणीमध्ये पदार्पण केले. पंजाबच्या डावामध्ये जशनप्रित सिंगने नाबाद 57 धावा झळकविल्या. सहारन आणि जशनप्रित सिंग यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 139 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. पंजाबने दुसऱ्या डावात 66.4 षटकात 2 बाद 227 धावा जमविल्या.
या सामन्यात पंजाबचा पहिला डाव 142 धावांत आटोपला होता तर चंदिगडने पहिल्या डावात 173 धावा जमविल्या होत्या. चंदिगडने 7 बाद 168 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा दुसरा डाव 195 धावांवर आटोपला. पंजाबच्या आयुष गोयलने 48 धावांत 4 तर हरप्रित ब्रारने 56 धावांत 3 गडी बाद केले. उदय सहारनने गेल्या आठवड्यात या स्पर्धेतील अनिर्णीत राहिलेल्या गोवा संघाविरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात 126 धावा जमविल्या होत्या.
रणजी स्पर्धेतील ब गटात मंगलपुरम येथे सुरू असलेल्या सामन्यात खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर सौराष्ट्रने केरळ विरुद्ध दुसऱ्या डावात 5 बाद 351 धावा जमविल्या. चिराग जेनीने 204 चेंडूत 4 षटकार आणि 14 चौकारांसहा 152 धावा झोडपल्या. या सामन्यात सौराष्ट्रचा पहिला डाव 160 धावांत आटोपला होता. तर केरळने पहिल्या डावात 233 धावा जमविल्या होत्या. प्रेरक मंकडने 61 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 52 तर अर्पित वासवदाने 147 चेंडूत 74 धावा जमविल्या. जेनी आणि वासवदा यांनी चौथ्या गड्यासाठी 174 धावांची भागिदारी केली.
पुणे येथे सुरू असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात कर्नाटकाने पहिल्या डावात 313 धावा जमविल्यानंतर महाराष्ट्राचा पहिला डाव 300 धावांत आटोपला. कर्नाटकाने पहिल्या डावात 13 धावांची नाममात्र आघाडी मिळविली. दिवसअखेर कर्नाटकाने दुसऱ्या डावात 5 बाद 144 धावा केल्या. अगरवाल 64 धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक : मंगलपुरम-सौराष्ट्र प. डाव 160, केरळ प. डाव 233, सौराष्ट्र दु. डाव 5 बाद 351 (चिराग जेनी 151, वासवदा 74, प्रेरक मंकड खेळत आहे 52),
पुणे- कर्नाटक प. डाव 313, महाराष्ट्र प. डाव 300, कर्नाटक दु. डाव 5 बाद 144 (अगरवाल खेळत आहे 64, चौधरी 3-70)
चंदीगड- चंदीगड प. डाव 173, पंजाब प. डाव 142, चंदीगड दु. डाव 195, पंजाब दु. डाव 2 बाद 227 (उदय सहारन नाबाद 117, जशनप्रित सिंग नाबाद 57).