बांगलादेश, पाक, शकीब हसन यांच्यावर दंडात्मक कारवाई
वृत्तसंस्था/ दुबई
बांगलादेशने पाकिस्तानवर ऐतिहासिक कसोटी विजय मिळविल्यानंतर या दोन्ही संघांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या कसोटीत षटकांची गती न राखल्याबद्दल आयसीसीने दोन्ही संघांना दंड केला असल्याचे सोमवारी जाहीर केले. बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसनवरही दंडात्मक कारवाई झाली आहे.
पाकिस्तानला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील 6 गुणांचा तर बांगलादेशला 3 गुणांचा दंड आयसीसीने केला आहे. या संदर्भात सामनाधिकाऱ्यांनी अहवाल तयार केला होता. या गुणांशिवाय दोघांना आर्थिक दंडही करण्यात आला आहे. पाकिस्तानला 30 टक्के तर बांगलादेशला 15 टक्के सामना मानधनातील रकमेचा दंड केला आहे.
सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी सांगितले की, पाकने निर्धारित वेळेत 6 षटके तर बांगलादेशने 3 षटके कमी टाकली. वेळेच्या सवलतीचा हिशेब काढल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी आपला अहवाल तयार केला होता. डब्ल्यूटीसी गुण वजा झाल्यानंतर बांगलादेशच्या क्रमवारीवरही परिणाम झाला असून बांगलादेश आता सातव्या स्थानावर घसरले आहे तर दक्षिण आफ्रिका त्यांच्यापेक्षा पुढे सरकले आहे. पाकचा आठवा क्रमांक मात्र कायम राहिला आहे.
आचारसंहितेतील कलमानुसार एक षटक कमी टाकल्यास संघाला पाच टक्के रकमेचा दंड केला जातो तर कसोटी चॅम्पियनशिपमधील एक गुण कमी केला जातो. दोन्ही कर्णधार शान मसूद व नजमुल हुसेन शांतो यांनी आपला गुन्हा आणि दंडात्मक कारवाई दोन्ही मान्य केल्याने त्यांची सुनावणी घेण्यात आली नाही.
याच सामन्यात अष्टपैलू शकीब अल हसनने पाकचा फलंदाज रिझवानच्या दिशेने अयोग्य पद्धतीने चेंडू फेकल्यानंतर त्याला सामना मानधनातील 10 टक्के रकमेचा दंड केला असून 24 महिन्यातील पहिला गुन्हा असल्याने त्याच्या नावावर एक डिमेरिट गुण जमा झाला आहे. शकीबनेही आपला अपराध व दंडात्मक कारवाई मान्य केल्याने अधिकृत सुनावणी घेण्यात आली नाही.