पुंगनूर गोधन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पशु आणि गाईंवर असलेले प्रेम कुणापासून लपलेले नाही. अत्यंत लहान जातीची गाय अर्थात पुंगनूर जातीचे गो-धन पंतप्रधानांच्या निवासस्थानी पाळण्यात आले आहे. या गाईने अलिकडेच एका गोंडस वासराला जन्म दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर या गाईंविषयीचे औत्सुक्य सर्वांनाच वाटू लागले आहे. यापूर्वी मकरसंक्रांतीवेळी आपल्या निवासात पाळण्यात आलेल्या गाईंना चारा भरवतानाची पंतप्रधानांची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यापासून या पुंगनूर गाईंची चर्चा सुरू झाली होती. पुंगनूर जातीच्या या गाई अतिशय सुंदर दिसतात. जो कोणी त्यांना पाहतो त्याच्या मनाला त्या मोहित करतात. त्या पार्श्वभूमीवर पुंगनूर जातीच्या गाईंविषयी माहिती उलगडण्याचा केलेला प्रयत्न...!
पुंगनूर गाईची ही जात दक्षिण भारतातील आंध्रप्रदेशात विकसित करण्यात आली असून ती जगातील सर्वात लहान गाय आहे. जगातील सर्वात लहान गाय असल्याने आंध्रात पुंगनूर गाईची जात मोठ्या प्रमाणावर सुधारली जात आहे. पुंगनूर गाय साधारणपणे 3 ते 5 फूट उंचीची असते. पुंगनूर गाईचे वासरू जन्माला येते तेव्हा त्याची उंची फक्त 16 ते 22 इंच असते.
पुंगनूर गाई सामान्य गाईंपेक्षा खूपच लहान असतात. ही एक दुर्मीळ जातीची गाय आहे. हे नाव आंध्र प्रदेशातील चित्तूर जिह्यातील पुंगनूर शहराच्या नावावरून पडले आहे. पुंगनूर गाय पांढरी आणि हलकी तपकिरी रंगाची असते. त्याची शिंगे अतिशय आकर्षक आणि लहान असतात. पुंगनूर गाईचे सरासरी वजन 105 ते 200 किलोपर्यंत असते.
पुंगनूर गाय आकाराने लहान असली तरी खूप मजबूत आणि रोगप्रतिरोधक आहे. या गाईंचे दूध अतिशय पौष्टिक असते आणि त्यात प्रथिने, पॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक घटक जास्त प्रमाणात असतात. विशेष म्हणजे सामान्य गाईच्या दुधात फक्त 3-4 टक्के पॅट असते. पण पुंगनूर गाईच्या दुधात आठ टक्क्मयांपर्यंत पॅट आढळते.
पुंगनूर ही गाईची 112 वर्षे जुनी जात आहे. तर 2019 मध्ये सूक्ष्म पुंगनूर विकसित करण्यात आली आहे. मूळ पुंगनूरचा जन्म वैदिक काळात विशिष्ट आणि विश्वामित्र ऋषींच्या काळात झाला. हवामानातील बदल आणि स्थान बदलाबरोबरच पुंगनूर गाईत काही बदल होत गेले. पूर्वी तीन फुटांपर्यंत असलेल्या जातीला ब्रह्मा असे संबोधत होते. सध्या संपूर्ण देशात केवळ 32 जाती शिल्लक आहेत. तर
प्राचीन काळी गाईंच्या तब्बल तीनशेहून अधिक जाती अस्तित्वात असल्याची माहिती या क्षेत्रातील अभ्यासक देतात. संकरातून ही जात विकसित करण्यात आल्याचे पशुप्रेमी सांगतात.
दूध-दह्यामध्ये औषधी गुणधर्म
पुंगनूर गाय पशुपालकांना करोडपती बनवू शकते. पुंगनूर गाय एकावेळी 3 लिटरपर्यंत दूध देऊ शकते. हे दूध अमृतसारखे आहे. पुंगनूर गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप मोठ्या भावाने विकले जाते. बाजारात सर्वसाधारण तुपाची किंमत 500 ऊपयांच्या आसपास असली तरी पुंगनूर गाईच्या तुपाची किंमत हजार रुपयांच्या घरात आहे. इतकेच नाही तर त्याच्या दुधापासून तयार केलेले ताक आणि दहीही महागड्या दराने विकले जाते. या गाईच्या दुधात अनेक औषधी गुणधर्म असल्याचे सांगितले जाते. साहजिकच ते अनेक आजार दूर करते. याशिवाय पुंगनूर गाईच्या मूत्रात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. आंध्रप्रदेशातील शेतकरी पिकांवर फवारणीसाठी त्याचा वापर करतात. त्यापासून पिकांचे किडीपासून संरक्षण करता येते.
‘लाख’मोलाचा भाव...
पुंगनूर गाईची किंमत 1 लाख ते 25 लाखांपर्यंत आहे. पुंगनूर गाय उंचीने जितकी लहान असेल तितकी तिची किंमत जास्त आहे. त्याची संख्या कमी असल्याने किंमत जास्त आहे. त्याची किंमत जास्त असल्याने या गाईंमध्ये हेराफेरीचे प्रकारही घडू लागले आहेत. आजकाल इतर जातीच्या गाईही पुंगनूर म्हणून विकल्या जात आहेत. गाई मौल्यवान असल्याने त्या शुद्ध जातीच्या आहेत की नाही हे ओळखणे गरजेचे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
ऐतिहासिक संदर्भ...
विशेष म्हणजे पुंगनूर गाय वैदिक काळापासून अस्तित्वात आहे. पुंगनूर गाईची पौराणिक कथा महषी विश्वामित्र यांच्याशीही जोडलेली आहे. पुंगनूर गाईचा इतिहास प्राचीन काळापासूनचा आहे. या गाईंचा उल्लेख अनेक प्राचीन भारतीय
ग्रंथांमध्ये आढळतो. हिंदू धर्मातील धार्मिक विधींसाठीही या गाईचा वापर केला जातो. अलिकडच्या काळात पुंगनूर गाईची लोकप्रियता वाढत आहे. ही जगातील सर्वात महागड्या गाईंपैकी एक आहे. ही अडीच-तीन फुटाची गाय ‘लाख’मोलाची आहे.
डॉ. कृष्णम राजूंची किमया
आंध्रप्रदेशातील काकीनाडा येथील एका डॉक्टरने 14 वर्षांच्या अथक परिश्र्रमानंतर पुंगनूर गाईची जात सुधारली आहे. सर्वात लहान गाय असल्याचा विक्रम पुंगनूर येथे आहे. या डॉक्टरने जात सुधारल्यानंतर अडीच फुटांची पुंगनूर गाय विकसित केली आहे.
पुंगनूरची सर्वसाधारण उंची तीन ते पाच फूट आहे. तर लघु पुंगनूरची उंची अडीच फुटांपर्यंत आहे. ही जात विकसित करणाऱ्या डॉक्टरांचे नाव डॉ. कृष्णम राजू असे आहे. डॉ. राजू यांनी साकारलेली नाडीपती गोशाळाही प्रख्यात आहे. त्यांनी संकरित जातीला मिनिएचर पुंगनूर असे नाव दिले.
आंध्रप्रदेश सरकारकडून संवर्धनासाठी उपाय
पुंगनूर गाई वाच्&विण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढविण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारही प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने ‘मिशन पुंगनूर’ सुरू केले असून त्या अंतर्गत 5 वर्षांसाठी सुमारे 70 कोटी ऊपयांचे बजेट देण्यात आले आहे. कडप्पा जिह्यात स्थित श्री व्यंकटेशनर पशुवैद्यकीय विद्यापीठ या योजनेवर काम करत आहे. साहजिकच आगामी काळात पुंगनूर गाईची लोकप्रियता जसजशी वाढत जाईल तसतशी त्यांची संख्याही वाढेल आणि काही वर्षांत ती सर्वत्र उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.
पशुधन लोकसंख्या-2013 नुसार, आंध्रप्रदेशात पुंगनूर गाईंची संख्या केवळ 2,772 होती. परंतु गेल्या काही वर्षांत पुंगनूर जातीच्या संवर्धनावर बरेच काम केले गेले आहे. त्याचवेळी 2019 मध्ये झालेल्या 20 व्या पशुधन गणनेनुसार पुंगनूर गाईंची संख्या 13,275 आहे. परंतु आता अनेक संशोधन केंद्रांनी त्याचे संवर्धन केल्यामुळे त्यांची संख्या वाढली आहे. मात्र, त्यांची संख्या किती आहे, याचा नेमका आकडा उपलब्ध नाही. देशात सर्वात कमी संख्या असलेल्या गाईंच्या जातींमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात बेलाही जातीच्या गाईंची संख्या सर्वात कमी 5,264 आहे. दुसऱ्या क्रमांकावर पानिकुलम गाई आहेत.
दक्षिण भारतात स्टेटस सिम्बॉल
गेल्या काही वर्षांत या गाई पाळण्याबाबत लोकांमध्ये जागृती झाली आहे. ते पाळणे आता दक्षिण भारतात ‘स्टेटस सिम्बॉल’ बनत चालले आहे. आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी, तिरुमला तिरुपती देवस्थानमचे चेअरमन एन. हरिकृष्ण यांच्यासह अनेक बड्या व्यक्ती या गाईचे संगोपन करत आहेत. तिऊमला तिऊपती देवस्थानममध्येही पुंगनूरच्या अनेक गाई आहेत. ही गाय सौभाग्याचे प्रतीकही मानली जाते. त्यामुळे या गाईची किंमत वाढत आहे.
शहरी भागांमध्येही संगोपन
पुंगनूर गाईंना शहरी घरांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न वाढवले जात आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी पुंगनूर या खास गाईंचे संगोपन करण्यात आले आहे. तसेच शहरी भागातील अनेक गो-प्रेमी त्या पाळताना दिसून येतात. अतिशय कमी जागेत त्यांची व्यवस्था करून त्यांच्यासोबत मौजमजा केली जाते. आंध्रप्रदेशातील चित्तूर जिह्यातील पुंगनूर येथे आढळणारी पुंगनूर गाय अतिशय अनोखी आहे. या गाईच्या ओळखीसोबत ‘पुंगनूर’ हे नाव जोडले गेले आहे. भारतातील इतर राज्यांमध्येही पुंगनूर गाईचा प्रचार केला जात आहे.
- संकलन - जयनारायण गवस