हरियाणाकडून पुणेरी पलटन पराभूत
वृत्तसंस्था/ जयपूर
2025 च्या प्रो-कबड्डी लीग स्पर्धेतील येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात हरियाणा स्टिलर्स संघाने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या पुणेरी पलटनला पराभवाचा धक्का दिला. या सामन्यात हरियाणा स्टिलर्सने पुणेरी पलटनचा 34-30 अशा 4 गुणांच्या फरकाने पराभव केला.
या सामन्यामध्ये हरियाणा स्टिलर्सच्या खेळाडूंनी आपल्या भक्कम बचाव फळीच्या जोरावर पुणेरी पलटनला वरचढ होऊ दिले नाही. पहिल्याच मिनिटाला हरियाणा स्टिलर्सला पहिला गुण राहूलने मिळवून दिला. त्यानंतर विनयने हरियाणाल दुसरा गुण मिळवून दिला. हरियाणा स्टिलर्सने पुणेरी पलटने सर्व गडी बाद करत 14-4 अशी भक्कम आघाडी मिळवली होती. पण सामन्याच्या उत्तरार्धात पंकज मोहितेने आपल्या अचूक चढायांच्या जोरावर पुणेरी पलटनला गुण मिळवून देत गुणांची आघाडी कमी केली. पण स्टिलर्सच्या विनयने आपल्या चढायांवर हरियाणाची आघाडी कायम राखली. मध्यंतराला 5 मिनिटे बाकी असताना हरियाणा स्टिलर्सने पुणेरी पलटनवर 17-9 अशी बढत मिळवली होती. सामन्याच्या उत्तरार्धात पुणेरी पलटनने अचूक चढायांवर हरियाणा स्टिलर्सला गाठण्याचा प्रयत्न केला पण त्यांना हा सामना 4 गुणांच्या फरकाने गमवावा लागला.
या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात तेलगु टायटन्सने तामिळ थलैवासचा 43-29 अशा 14 गुणांच्या फरकाने पराभव केला. या सामन्या तेलगु टायटन्सच्या विजय मलिकने सुपर 10 गुण नोंदविले. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आता तेलगु टायटन्स 9 सामन्यातून 8 गुणासह चौथ्या स्थानावर आहे.