पुणेरी पलटन विजयासह पुन्हा आघाडीवर
वृत्तसंस्था/ जयपूर
2025 च्या प्रो-कबड्डी लीग हंगामात जयपूरच्या दुसऱ्या टप्प्यात खेळविण्यात आलेल्या सामन्यात पुणेरी पलटनने तेलुगू टायटन्सचा 39-33 अशा 6 गुणांच्या फरकाने पराभव करत गुणतक्त्यात पुन्हा आघाडीचे स्थान मिळविले.
या सामन्यात गौरव खत्री आणि विशाल भारद्वाज यांची कामगिरी आक्रमक झाल्याने पुणेरी पलटनला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. दरम्यान भरत हुडाने सुपर 10 गुण नोंदविले. या सामन्यामध्ये अस्लम इनामदार आणि भरत हुडा यांच्या चढायांमध्ये खरी चुरस निर्माण झाली होती. पंकज मोहिते आणि विशाल भारद्वाज यांनी आपल्या चढायांवर पुणेरी पलटनला 2 गुणांची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तेलुगू टायटन्सने पुन्हा 6-6 अशी बरोबरी साधली. पहिल्या सत्राअखेर पुणेरी पलटनने तेलुगू टायटन्सवर केवळ एका गुणाची आघाडी मिळवली होती. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पुणेरी पलटनने तेलुगू टायटन्सवर 24-14 अशी भक्कम बढत घेतली होती. गौरव खत्रीने या कालावधीत आपल्या संघाला 4 गुण मिळवून दिले. आदित्य शिंदे आणि पंकज यांनी तेलुगू टायटन्सवर चांगले दडपण आणले होते. तेलुगू टायटन्सच्या भरत हुडाने सुपर 10 गुण मिळविले. अखेर पुणेरी पलटनने हा सामना 39-33 अशा 6 गुणांच्या फरकाने जिंकून गुणतक्त्यात पुन्हा आघाडीचे स्थान मिळविले आहे.