परदेशी खेळाडूंसह उद्या रंगणार पुणे मॅरेथॉन
15,000 पुणेकर धावणार : सणस मैदानात बक्षीस वितरण
पुणे / प्रतिनिधी
देशातील पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन असणारी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा 39 वे वर्ष साजरे करत असून, यंदा रविवार दिनांक 7 डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजता 42.195 किमी च्या महिलापुरुष पूर्ण मॅरेथॉन चा प्रारंभ सणस मैदानाजवळील हॉटेल कल्पनाविश्व येथून होईल. तसेच येथूनच महिलापुरुष अर्ध मॅरेथॉन दहा किमी, पाच किमी व व्हीलचेअर स्पर्धांचा प्रारंभ होईल. यामध्ये केनिया, इथिओपिया, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, श्रीलंका येथील 70 हून अधिक परदेशी खेळाडूंसह एकूण 11 गटांत सुमारे 15000 हून अधिक धावपटू या स्पर्धेत भाग घेतील.
याचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता सणस मैदान येथे संपन्न होईल. यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. मेधा कुलकर्णी, आमदार बापू पठारे, पासपोर्ट अधिकारी विनोद गायकवाड, शिक्षणतज्ञ अबेदा इनामदार व प्रवीण मसालेवाले ग्रुपचे विशाल चोरडिया उपस्थित राहणार आहेत. पुणे महानगर पालिकेतर्फे 35 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.
रविवारी 7 डिसेंबर रोजी पहाटे 3:00 वाजता सणस मैदान येथील हॉटेल कल्पना-विश्व चौकातून 42.195 किलोमीटरच्या पुरुष व महिला पूर्ण मॅरेथॉनला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येईल. तसेच पहाटे 3: 30 वाजता पुरुष-महिला (21.095) अर्ध मॅरेथॉन, 10 कि.मी.सकाळी 6:30 वाजता, 5 कि.मी. सकाळी 7:00 वाजता आणि सकाळी 7:15 वाजता व्हील चेअर 3 कि.मी या स्पर्धांना सुरुवात होईल.
पुरुष व महिला पूर्ण मॅरेथॉन यंदा नव्या मार्गाने जाईल.
सणस मैदानासमोरील हॉटेल कल्पना-विश्व चौक येथून निघून सणस चौक - बाजीराव रस्ता - नगरकर तालीम लक्ष्मी रोड - कुलकर्णी पेट्रोल पंप तेथून फिरून शनिवार वाडा शिवाजी पूल मनपा भवन मॉडर्न कॅफे जंगली महाराज रोड डेक्कन जिमखाना संभाजी महाराज पुतळा खंडूजी बाबा चौक कर्वे रस्ता कर्वे पुतळा - डावीकडे वळून इराणी कॅफे करिश्मा बिल्डींग म्हात्रे पूल येथे वळून मेहेंदळे गॅरेज डी पी रोड जोशी किचन पंडित फार्म राजाराम पूल सिंहगड रोड डावीकडून नवशा मारुती पु ल देशपांडे उद्यान पानमळा दांडेकर पूल पर्वती पायथा महालक्ष्मी चौक सारसबाग सणस पुतळा येथून डावीकडे हॉटेल कल्पना-विश्व हा 21.095 किमीचा पहिला टप्पा पूर्ण करून तेथूनच दुसरा टप्पा सणस पुतळा महालक्ष्मी चौक - स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्या समोरून, खंडोबा मंदिराहून दांडेकर चौक तेथून सरळ सिंहगड मार्गे, गणेश मळा, राजाराम पूल संतोष हॉल, गोयल गंगा चौक, धायरी पुलावरून, नांदेड सिटीच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाऊन डिस्टेंशन सेंटर येथे सर्कलला गोल वळसा घेऊन परत त्याच मार्गे सणस मैदान येथे परत येईल व 42.195 ची पूर्ण मॅरेथॉन सणस मैदानात पूर्ण होईल. मॅरेथॉन साठी वैद्यकीय पथकांची सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली आहे.
याशिवाय पुणे पोलीस व वाहतूक पोलीस यांचा चोख बंदोबस्त स्पर्धा मार्गावर राहणार असून पुणे महानगर पालिकेतर्फे संपूर्ण मार्गावर पुरेशी उजेड व्यवस्था करण्यात आलेली आहे.