परमीट रूम, बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासणार ! 21 वर्षाखालील व्यक्तीस मद्म दिल्यास कारवाई : पुण्याच्या घटनेनंतर प्रशासन अॅक्शनमोडवर
राज्य उत्पादन शुल्कची 550 बारना नोटीस : बार सुरू ठेवण्याच्या वेळेतही बदल : नियमांची अंमलबजावणी केली नसल्यास दंडसह परवान रद्द
विनोद सावंत कोल्हापूर
जिल्ह्यातील परमीटरूम, बार चालकांना येथून पुढील दोन महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज राज्य उत्पादन शुल्क विभागाला देणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भातील जिल्ह्यातील 550 परमीट रूम, बालचालकांना नोटीस बजावली आहे. यामध्ये 21 वर्षाखालील व्यक्तीस मद्य देण्यास सक्त बंदी घातली असून बार सुरू ठेवण्याच्या वेळेतही बदल केली आहे.
पुण्यात अल्पवयाच्या मुलाने मद्य पिऊन कारचालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला. तसेच काही दिवसांपूर्वी येथेच ड्रग्ज प्रकरणामध्येही अल्पवयाचे मुले सापडले. या घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग अॅक्शनमोडवर आले आहे. मुंबई विदेशो मद्य नियम, 1953 नियम 52 ची अंमलबजावणी कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे आदेश जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिले आहेत. त्युनसार गेल्या चार दिवसांपासून विशेष पथकामार्फत जिल्ह्यातील परमीट रूम, बारची तपासणी केली जात आहे. नियमांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात जिल्ह्यातील सुमारे 550 बार चालकांना नोटीस बजावली आहे. यामध्ये म्हटले आहे, मद्य वितरण करतांना मद्यसेवन परवाना किंवा सौम्य मद्य वितरण करताना वयाचा पुरावा न पाहता मद्यविक्री करण्याचे प्रकार यापुर्वीच्या वेगवेगळ्या कार्यवाहीवरुन उघडकीस आले आहे. हे योग्य नसून नियमांची अंमलबजावणी कठोर करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह परवाना रद्द केला जाणार आहे.
बार या नियमानुसार चालणार
-21 वर्षाखालील व्यक्तीस मद्य विक्रीस बंदी
-21 ते 25 वयाच्या व्यक्तीस सौम्य बिअर मिळणार
-25 वर्षावरील व्यक्तीस सर्व प्रकारचे मद्य विक्री करणे.
-सकाळी 11.30 ते रात्री रात्री 11.30 या वेळेतच बार सुरू ठेवणे.
-21 वर्षाखाली मुलांना प्रवेश बंद असल्याचे फलक दर्शनी भागी लावणे.
-वयाचे पुरावे पाहूनच बारमध्ये प्रवेश देणे.
-मद्याच्या मेन्युकार्डवरही नियमावली लिहणे.
तर बारच्या व्यवस्थाकापवरही कारवाई
बारमधील व्यवस्थापकाची नेमणूक वयाचे पुरावे तपासणीसाठी करावी. यामध्ये त्याने हलगर्जीपणा केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे या आदेशात स्पष्ट केले आहे.
दोन महिन्याचे फुटेज तपासून होणार कारवाई
बारमध्ये सीसीटीव्ही नसेल तर ते लावावा लागणार असून येथून पुढील दोन महिन्यांचे फुटेज उत्पादन शुल्क विभागाला देणे बंधणकरक केले आहे. या फुटेज मध्ये 21 वर्षाखालील व्यक्तीस मद्य दिल्याचे आढळून आल्यास बारचालकांवर कारवाई होणार आहे.
विशेष मोहिम राबवून 1953 चे नियम 44 य 45 ची कडक अंमलबजावणी करण्याच्या सक्त सूचना राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्तांनी व्हिसीद्वारे केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे 550 परमीट रूम, बारच्या संबंधितांना नोटीस बजावली आहे. यामध्ये 21 वर्षाखालील कोणालाही मद्य विक्री करू नये, अशा स्पष्ट सूचना केल्या आहे. यानुसार विशेष पथकांमार्फत तपासणीची मोहिमही राबवली जात आहे.
रविंद्र आवळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण बार-सुमारे 550.
बिअर शॉपी-250
वाईन्स दुकाने-40
बार सुरू ठेवण्याचा कलावधी केला कमी
यापूर्वी 18 वर्षावरील व्यक्तीस बारमध्ये प्रवेश दिला जात होता. तसेच सकाळी 9 वाजता बार सुरू केले जात होते. आता नियमावलीची अंमलबजावणी कडक केली असून उत्पादन शुल्कचे पथकही तपासणीसाठी येत आहे. यामुळे 21 वर्षावरील व्यक्तीलाच बारमध्ये प्रवेश द्यावा लागत आहे. तसेच सकाळी 11.30 वाजताच बार सुरू करावा लागत आहे. याचा फटका बार चालकांना बसत आहे.