पुणे-हुबळी वंदे भारतचा रविवारी श्रीगणेशा?
पंतप्रधान मोदींकडून हिरवा झेंडा दाखवून होणार प्रारंभ : प्रवाशांना मिळणार वेगवान प्रवासाचा लाभ
बेळगाव : पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखविणार आहेत. रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी उद्घाटन करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु, अद्याप वेळापत्रक रेल्वे बोर्डने जाहीर केलेले नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या मागणीनुसार पुणे-हुबळी मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली जाणार आहे. बेळगावमधून पहिल्यांदाच वंदे भारत धावणार असल्याने प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे. बेळगाव व पुणे या दोन शहरांचे नेहमीच घनिष्ठ संबंध राहिले आहेत.
शिक्षण, उद्योग, व्यापार, रोजगार यामुळे या दोन शहरांमध्ये नागरिकांची नेहमी ये-जा असते. त्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास प्रवाशांना वेगवान प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले वेळापत्रक हे तात्पुरत्या स्वरुपातील आहे. अद्याप रेल्वे बोर्डने कायमस्वरुपी वेळापत्रक नैर्त्रुत्य रेल्वेला दिलेले नाही. त्यामुळे वंदे भारतची वेळ नेमकी कोणती असणार, याची उत्सुकता प्रवाशांमध्ये आहे. नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सातारा ते पुणे दरम्यान अद्याप दुपदरीकरणाचे काम सुरू
हुबळी ते साताऱ्यापर्यंत रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण झाले असल्याने वेगवान प्रवास करता येणार आहे. परंतु, सातारा ते पुणे या दरम्यान अद्याप दुपदरीकरणाचे काम सुरू असल्याने एकेरी मार्गावरूनच वाहतूक करावी लागणार आहे. यासाठी मध्य रेल्वेचा पुणे विभाग अभ्यास करत असून वेळापत्रकास विलंब लागत आहे. विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्याने पुणे-हुबळी मार्गावर वेगवान वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे.