पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धा जानेवारीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतामध्ये पहिल्यांदाच पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय 2.2 दर्जाची सायकलिंग रोडरेस आयोजित केली असून ही स्पर्धा 19 ते 23 जानेवारी दरम्यान घेतली जाणार आहे. या स्पर्धेत यजमान भारताने आपले दोन संघ सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे. या स्पर्धेसाठी आता अखिल भारतीय सायकलिंग फेडरेशनने ओदीशातील संबळपूर येथे 2 ते 6 डिसेंबर दरम्यान राष्ट्रीय चॅम्पियनशिप निवड चाचणी सायकलिंग रोडरेस स्पर्धा आयोजित केली आहे. आगामी स्पर्धेत यजमान भारत आपले दोन संघ उतरविणार आहे. इंडिया अ आणि इंडिया ब अशा दोन संघांमध्ये दर्जेदार सायकलस्वारांचा समावेश राहील. बजाज पुरस्कृत बजाज पुणे ग्रँड सायकलिंग टूर स्पर्धा पुण्यात होणार आहे.
पहिल्या पुणे ग्रँड टूर आंतरराष्ट्रीय सायकलिंग रोडरेसमध्ये विविध देशांचे अव्वल स्पर्धक सहभागी होणार आहेत. ही रोडरेस चार टप्प्यामध्ये घेतली जाईल. 437 कि.मी. पल्ला स्पर्धकांना या चार टप्प्यात गाठावा लागणार आहे.