For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावधान...! रेल्वेची अलार्म चेन ओढताय ? विनाकारण चेन ओढल्यावरून पुणे विभागात 1176 जणांवर कारवाई

06:03 PM Sep 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
सावधान     रेल्वेची अलार्म चेन ओढताय   विनाकारण चेन ओढल्यावरून पुणे विभागात 1176 जणांवर कारवाई
Pulling the railway alarm chain without reason Pune division
Advertisement

9 महिन्यांत संबंधितांकडूक 5 लाख 62 हजार रूपयांचा दंड वसूल : कारवाईसाठी विशेष पथकाची नियुक्ती

विनोद सावंत कोल्हापूर

विनाकारण रेल्वेतील अलार्म चेन ओढल्यास संबंधितांवर दंडात्मक तसेच अटकेची कारवाई केली जाते. पुणे विभागात रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारे यावषीं नऊ महिन्यांत 1 हजार 176 जणांवर कारवाई केली आहे. संबंधितांकडून 5 लाख 62 हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.

Advertisement

रेल्वेगाड्यांच्या विनाकारण अलार्म चेन पुलिंगमुळे रेल्वेला आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्याचा परिणाम रेल्वेच्या नियमितपणावर होत असल्याने अनेक गाड्या नियोजित वेळेवर पोहोचत नाहीत. इतर रेल्वे प्रवाशांना अन्य समस्यांना सामोरे जावे लागते. ट्रेन नियोजितस्थळी 10 मिनिटे उशिरा पोहोचते. या दरम्यान रेल्वे ट्रेन उभी असताना काही प्रवासी उत्सुकतेपोटी खाली उतरतात आणि ट्रेन अचानक सुरू झाल्यावर ट्रेनमध्ये चढताना अपघात होतो. काही रुग्णांना जीवही गमवावा लागतो. त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात कडक भूमिका घेतली आहे.

रेल्वे कायदा 1989 च्या कलम 141 नुसार, अनावश्यक अलार्म चेन ओढणे हा गुन्हा आहे. या कलमांतर्गत 1 वर्षे कारावास किंवा 1 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स पुणे विभागाने यावर्षी 9 महिन्यांत एकूण 1176 रेल्वे प्रवाशांवर अनधिकृत चेन पुलिंग प्रकरणी कारवाई करून दंड वसूल केला आहे.

Advertisement

सरकारी नोकरी गमावणार
रेल्वेमधील अलार्म चेनचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीच होणे आवश्यक आहे. विनाकारण चेन ओढल्यास गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो. यामध्ये दोष सिद्ध झाल्यास दंडासोबत अटकेचीही कारवाई होऊ शकते. रेल्वेच्या नियमामध्ये यासंदर्भातील कारवाईत बदल केला आहे. विनाकारण कोणी साखळी ओढली असेल आणि संबंधित सरकारी कर्मचारी असेल तर त्याला नोकरीला मुकावे लागणार आहे. संशयिताचे नाव डीसीआरबीमध्ये पाठवले जाते. सरकारी नोकरीमध्ये आवश्यक चरित्र प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. असणारी शासकीय नोकरी जाऊ शकते. तसेच नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यास नोकरी मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

रेल्वेतील अलार्म चेनचा वापर केव्हा करावा...
-कोणी व्यक्ती किंवा प्रवाशाची रेल्वे सुटल्यास
-रेल्वेत आगीची घटना घडल्यास
-ज्येष्ठ व्यक्ती किंवा दिव्यांग रेल्वेत चढताना रेल्वे निघणे
-रेल्वेच्या डब्यात एखाद्याची प्रकृती अचानक बिघडल्यास
-रेल्वेत हाणामारी, दोन गटात वाद झाल्यास
-प्रवासी चढताण अथवा उतरताना अपघात झाला असल्यास

साखळीला पर्याय वॉकीटॉकी
साखळीला पर्यायासाठी रेल्वे प्रशासनाकडून चालक व सहचालकाचा नंबर प्रत्येक डब्यामध्ये लावण्याचे केले नियोजन आहे. अडचणीमध्ये या नंबरवर प्रवाशांना संपर्क साधता येईल. दर तीन डब्यामध्ये एक कर्मचारी वॉकीटॉकीसह रेल्वेमध्ये फिरत राहील. अडचणीवेळी हा कर्मचारी वॉकीटॉकीवरून केबिनला माहिती देईल.

प्रतिक्रिया
विनाकारण रेल्वेतील अलार्म चेन ओढल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडून विशेष पथक तैनात केले आहे. हे पथक अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करते.
रामपाल बडपग्गा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे

Advertisement
Tags :

.