Ajit Pawar | जनतेचा पैसा योग्य खर्च झाला पाहिजे; अन्यथा कारवाई करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
उजनी–कुर्जुवाडी ११६ कोटी पाणीपुरवठा योजनेला पवारांचे आश्वासन
कुर्जुवाडी : जनतेचा, समाजाचा पैसा सत्कारणी लागला पाहिजे. त्याच्यामध्ये चुका होता कामा नये. मागील काळात आ. संजयमामा शिंदे असताना आम्ही मदत केली. परंतु, त्याच्यामधील काही मदत योग्यरितीने खर्च झाली नाही. समाजाच भले आपण केले पाहिजे. आजचा दिवस उद्या परत येणार नाही. आजचा गेलेला मिनीट परत येणार नाही.
याही वेळेस मामा आम्ही मदत करणार आहे परंतु या भागातून येताना जाताना पैसे त्याच कामाकरीता खर्च झाले का नाही तेही पाहणार आहे. तर काही तरी सुधारणा होईल. नाहीतर आम्ही वरून मदत करायची आणि ते पैसे तिसरीकडेच झिरपायचे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
कुर्दुवाडीतील राष्ट्रवादी व रिपाई युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ येथील गांधी चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी संजय मामांचे सुपुत्र यशवंत शिंदे व सून गार्गी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भव्य पदयात्रा काढण्यात आली होती. या पदयात्रेचे रूपांतर या जाहीर सभेसमोर झाले.
कुर्जुवाडीतील रेल्वे कारखान्यात वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागतील, स्थानिक लोकांना रोजगार मिळाला तर आर्थिक सुबत्ता येईल. नियमित स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणी मिळाले पाहिजे यासाठीच्या ११६ कोटींच्या उजनी ते कुर्जुवाडी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यासाठी निधीची गरज असते, त्यासाठी तुम्ही नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी मंचावर युतीचे नगराध्यक्ष सुरेखा गोरे व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार व मान्यवर उपस्थित होते.
बारामती असेल, पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी जाऊन बघा सगळे शहर स्वच्छ असते. आपल्या कुर्जुवाडीत होकर्स झोन तयार व्हायला पाहिजेत. टपऱ्यांच्या ऐवजी त्याचा उपयोग होतो. शहरात गतिरोधक, खेळाचे मैदान, जॉगिंग पार्क एवढ्या गोष्टी करण्यासाठी मी तुम्हाला मदत करेल. मी शब्दाचा पक्का आहे आणि कामाचा माणूस आहे एवढे लक्षात ठेवा, असेही ते म्हणाले.ओंकार घोडके व गौरी गोडगे यांनी सूत्रसंचालन केले. शहराध्यक्ष दत्ताजी काकडे यांनी आभार मानले.