वक्फ बोर्ड विरोधात मंगळवारी जाहीर सभा
नागरिक हितरक्षण समितीतर्फे धर्मवीर संभाजी उद्यान येथे आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
देशात वक्फ बोर्डने दावा केल्याने अनेक शेतकरी भूमीहीन होत आहेत. 2013 मध्ये तत्कालिन काँग्रेस सरकारने वक्फ बोर्ड कायद्यात दुरुस्ती करून अनियंत्रित अधिकार वक्फ बोर्डला दिले. त्याचे दुष्परिणाम सध्या दिसत आहेत. शेतकरी, सरकारी, मठ, मंदिरांच्या लाखो एकर जमिनीवर वक्फने कब्जा केला आहे. या विरोधात जनजागृतीच्या उद्देशाने मंगळवार दि. 12 रोजी बेळगावमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. धर्मवीर संभाजी उद्यान येथे सायंकाळी 6 वाजता सभा होणार असल्याची माहिती नागरिक हितरक्षण समितीचे डॉ. बसवराज भागोजी यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
देशाच्या हिताच्या दृष्टीने हा कायदा अत्यंत घातक आणि बाधक आहे. या कायद्यात सुधारणा करण्याचे काम सध्याच्या केंद्र सरकारकडून सुरू आहे. हे लक्षात आल्यानंतर वक्फ बोर्डने कर्नाटकातील अनेक जमिनी अन्नदात्याला झुगारून आपल्या ताब्यात घेण्याचा सपाटा लावला आहे. विजयपूर, गदग, कलबुर्गी जिल्ह्यातील शेती, मठ, मंदिरे, स्मशानाच्या जमिनींच्या उताऱ्यात वक्फच्या नावाची नोंद आढळून येत आहे.
बेळगाव जिल्ह्यातही अशा अनेक घटना निदर्शनास येत आहेत. या विरोधात समाजाने जागृत होऊन आंदोलन करण्याची आवश्यकता आहे. मंगळवारी धर्मवीर संभाजी उद्यानात सायंकाळी 6 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला कोल्हापूरच्या कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर बेळगाव जिल्ह्यातील अनेक मठाधीश, संत, स्वामी उपस्थित राहून विचार मांडणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.
पत्रकार परिषदेवेळी सुनील गौराण्णा, शिवाजी शहापूरकर, विजय जाधव, रोहन जुवळी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.