सार्वजनिक बाबा
कष्टकऱ्यांचे नेते, ‘हमाल पंचायती’चे संस्थापक, ‘एक गाव एक पाणवठा’ चळवळीचे प्रणेते, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाने पुण्यासह महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील ‘सार्वजनिक बाबांना’च समाज मुकला आहे. महाराष्ट्राला समाजसुधारणेचा मोठा इतिहास लाभला आहे. राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी तळागाळातील समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. शाहू, फुले, आंबेडकरांचा हा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेला, तो बाबांसारख्या खंद्या शिलेदारांनी. बाबांचा संपूर्ण जीवनपट हा सामाजिक सुधारणेचा महाग्रंथच म्हणावा लागेल. घरातूनच बाबांना सत्यशोधकी विचारांचे संस्कार मिळाले. तर शाळेत असताना त्यांचा राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला. 1942 पासून 1950 पर्यंत ते नियमितपणे राष्ट्र सेवा दलाच्या शाखेमध्ये जात असत. साने गुऊजी व एस. एम. जोशी यांच्या आचार, विचार व कार्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि समाजसेवेचा वसा घेतला. तो अखेरपर्यंत सोडला नाही. बाबा पेशाने मूळचे डॉक्टर. पुण्यातील नाना पेठेत त्यांनी दवाखाना सुरू केला, तोही सामाजिक भावनेतून. तिथेच अंगमेहनतीचे काम करणाऱ्या हमाल, कामगारांच्या वेदना, दु:ख, आर्थिक शोषण त्यांना समजून घेता आले. अठराविश्व दारिद्र्याशी झगडणाऱ्या, पिचलेल्या या लोकांना कुठलेही कायदेशीर संरक्षण नाही, ही बाब बाबांचे मन अस्वस्थ करून गेली. त्यातूनच डॉक्टरकीचा व्यवसाय सोडण्याचे धाडस त्यांनी दाखवले आणि कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी 1956 मध्ये ‘हमाल पंचायती’ची स्थापना केली. मुख्य म्हणजे बाबांच्या कार्याला कोणतीही सीमा नव्हती. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांचे संघटन त्यांनी उभे केले. तळातील कष्टकरी, मजूर वर्गाला कुणी वाली नाही, हे ओळखून असंघटित, वंचित कामगार, कष्टकरी, विशेषत: हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांना त्यांनी एकत्र आणले. त्यांना न्याय, सामाजिक सुरक्षा आणि सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. अंगमेहनतीची कामे करणाऱ्या मजुरांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. हे हेरून ‘कष्टाची भाकर’सारखा उपक्रम त्यांनी सुरू केला. त्यातून अनेकांच्या पोटातील आग शमवली. 1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले. पण, तिथेही त्यांचे रमले नाही. कारण, त्यांचा मूळ पिंड हा सामाजिक कार्यकर्त्याचा होता. या पदावर असताना कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील, त्यांच्याकरिता वेगळी तरतूद नसेल, तर तिथे राहून काय उपयोग, यांसारख्या प्रश्नांनी त्यांच्या मनात घर केले आणि त्यांनी नगरसेवकपद सोडून लोकचळवळीत स्वत:ला वाहून घेतले. पदोपदी स्वार्थासाठी व वैयक्तिक हितासाठी पक्ष बदलणाऱ्या आजच्या राजकारण्यांसाठी बाबांचे हे उदाहरण अभ्यासण्यासारखे आहे. बाबांवर संस्कार झाले ते सत्यशोधनाचे. फुलेंचा हा समतेचा विचार बाबा अक्षरश: जगले. महात्मा फुलेंनी आपला पाण्याचा हौद दलितांसाठी खुला केला होता. हाच कृतिशील वारसा म्हणजे बाबांची ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ होय. या माध्यमातून जातीय भेदभावाविऊद्ध लढण्यासह समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. स्वातंत्र्यलढ्यापासून संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्तीसंग्रामापर्यंत प्रत्येक आंदोलनात बाबा हिरिरीने सहभागी झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मशाल मोर्चात भाग घेणाऱ्या बाबांना कारावासही भोगावा लागला होता. कष्टकऱ्यांबरोबरच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बाबा आक्रमक होत. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते होणाऱ्या कुकडी प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभाला त्यांनी केलेला कडवा विरोध वा अभूतपूर्व सत्याग्रह देशभर गाजल्याच्या आठवणी अजूनही सांगितल्या जातात. विठोबा मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा, यासाठी दिलेला लढा, गांधीहत्येनंतर ब्राह्मणांना संरक्षण देण्याची घेतलेली भूमिका, अन्नधान्य दरवाढीविऊद्ध भोगलेला पहिला तुऊंगवास, हमालांच्या हक्कांसाठी केलेला संघर्ष, हमालनगर येथे त्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी केलेला पाठपुरावा, झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसनासाठी केलेले यत्न, माथाडी व हमाल कायदापहिला सामाजिक सुरक्षा कायदा करण्यासाठी उपसलेले कष्ट, या साऱ्यातून समाजातील वंचित घटकाच्या कल्याणाविषयी असलेली बाबांची तळमळच अधोरेखित होते. पथकरी, फेरीवाले, देवदासी स्त्रिया, घरेलू कामगार कुणीच त्यांच्या नजरेतून सुटले नाही. कचरा वेचकांसाठी ‘कागद काच पत्र कष्टकरी पंचायत’, मजुरांसाठी बांधकाम कामगार पंचायत, ऑटो रिक्षा चालकांसाठी रिक्षा पंचायत, असुरक्षित कामगारांच्या मुलांसाठी शाळा, सामाजिक सुरक्षा कायद्यासाठी महाड ते दिल्ली सायकल रॅली अशा अनेक पातळ्यांवर बाबांनी काम केले. त्याला तोड नाही. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेकरिता त्यांनी हमीद दलवाई यांना साह्या केले. तर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली. असंघटित कामगार, दलित, महिलांचे हक्क, धार्मिक एकता आणि सामाजिक न्यायासाठी सातत्यपूर्ण लढा दिला. समाजातला नाही रे वर्ग मुख्य प्रवाहात आला पाहिजे, त्याच्या मूलभूत गरजा भागल्या पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, ही बाबांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी संवादी भूमिका घेतली आणि वेळ आली तेव्हा अनेक आंदोलने व लढेही दिले. प्रसंगी सरकारशी दोन हात केले व तुरुंगवास भोगला. अगदी वयाच्या नव्वदीतही त्यांनी आपली ही संवादी आणि संघर्षशील भूमिका कायम ठेवली. लोकशाही समाजवाद, सत्याग्रह यावर त्यांची अविचल निष्ठा होती. त्यामुळे या विचारांचा त्यांनी अखेरपर्यंत पुरस्कार केला आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी डोळ्यात तेल घालून काम केले. बाबांच्या निधनामुळे लोकशाही समाजवादावर निष्ठा असलेला आणि तळागाळातील लोकांचा विचार करणारा शेवटचा दुवा निखळला आहे. सध्याचा काळ हा कष्टकरी, कामगारांसाठी आव्हानात्मक असा आहे. अशा काळात बाबा आपल्यातून निघून जाण्याचे दु:ख मोठे आहे. कष्टकऱ्यांच्या या बाबांना भावपूर्ण आदरांजली !