भुस्खलनावर मात करण्यासाठी 800 कोटींची तरतूद
महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा यांची ग्वाही : भुस्खलन स्थळांची पाहणी
कारवार : राज्यातील भुस्खलन आणि समुद्र किनाऱ्याची धूप समस्येवर मात करण्यासाठी 800 कोटी रुपयांच्या अनुदानाची लवकरच तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी दिली. मंत्री भैरेगौडा यांनी मंगळवारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भुस्खलन स्थळांची पाहणी केली आणि त्यानंतर कुमठा येथे बोलताना माहिती दिली. कारवार जिल्ह्यासह राज्यातील एकूण सहा जिल्ह्यांत पावसाळ्यात दरडी कोसळणे, भुस्खलन समस्या गंभीर स्वरुप धारण करीत आहे. या समस्येमुळे केवळ वाहतुकीचीच समस्या निर्माण होत नाही तर वित्तीय हानीसह जीवित हानीही होत आहे. या गंभीर समस्येवर 800 कोटी रुपये पैकी 500 कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात येत आहे.
जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार (उत्तर कन्नड), मंगळूर (दक्षिण कन्नड) आणि उडुपी जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात समुद्र किनाऱ्यांची धूप समस्या गंभीर स्वरुप धारण करीत आहे. या समस्येमुळे समुद्र किनाऱ्यांची हानी होत आहे. शिवाय समुद्र किनाऱ्यावर वास्तव्य करुन राहणाऱ्या नागरिकांचे विशेष करुन गरीब आणि मागासवर्गीय मच्छीमारी कुटुंबाचे प्रचंड हाल होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी संरक्षण भिंत उभारुन समुद्र किनाऱ्यावर होणारी धूप रोखण्यासाठी 800 कोटी रुपयांपैकी 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. यापैकी किनारपट्टीवरील तीन जिल्ह्यांना प्रत्येकी 100 कोटी रुपये अनुदानाची तरतूद करण्यात येणार आहे.
केंद्राकडून अनुदान मंजूर करण्यास विलंब
मंत्री भैरेगौडा पुढे म्हणाले, समुद्र किनाऱ्यावर संरक्षण भिंत किंवा भुस्खलन संरक्षण भिंत निर्माणसह नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी आवश्यक असलेले अनुदान मंजूर करताना केंद्र सरकारच्या वित्तीय खात्याकडून विलंब होत आहे. परिणामी संरक्षण भिंती आणि नैसर्गिक आपत्ती कामे हाती घेत असताना विलंब होत आहे.
राज्यातील 1500 पाऊस मापन केंद्राची दुरवस्था
कारवार जिल्ह्यातील 136 हून अधिक पर्जन्यमापन केंद्रे नादुरुस्त झाली आहेत. तर राज्यातील सुमारे 1500 पाऊस मापन केंद्रांची दुरावस्था झाली आहे. ही केंद्रे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या केंद्रांवरील यंत्रणा निकामी झाली असेल तर नवीन यंत्रे बसविण्यात येतील. यावेळी जिल्हा पालकमंत्री आणि मच्छीमारी व बंदर खात्याचे मंत्री मंकाळू वैद्य, कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल, कुमठाचे आमदार दिनकर शेट्टी, जिल्हाधिकारी के. लक्ष्मीप्रिया आदी उपस्थित होते.
महसूल रेकॉर्डचे संगणकीकरण
राज्यातील महसूल रेकॉर्डचे संगणकीकरण करण्यात येत आहे. जनतेला सुलभपणे रेकॉर्डस मिळतील यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुढील सहा महिन्यात राज्यातील सर्व महसूल रेर्कार्डसचे संगणकीकरण करण्यात येईल अशी माहिती पुढे मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी दिली.