इलेक्ट्रिक कामाच्या देखभालीसाठी राखीव निधीची तरतूद
महानगरपालिकेच्या बांधकाम स्थायी समितीत विविध विषयांना मंजुरी
बेळगाव : शहर व उपनगरातील विविध प्रभागांमध्ये पथदीप, हायमास्ट त्याचबरोबर महापालिकेत युपीएस व कॉम्प्युटर बसविण्याबाबत शुक्रवारी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती बैठकीत चर्चा करून मंजुरी देण्यात आली. उपस्थित सदस्यांनी आपल्या प्रभागांमधील समस्या यावेळी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रामुख्याने दक्षिण, उत्तर आणि सेंट्रल विभागातील इलेक्ट्रिक कामाच्या मेंटेनन्ससाठी राखीव निधी ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी बांधकाम स्थायी समितीची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माधवी सारंग राघोचे होत्या.
व्यासपीठावर उपमहापौर वाणी जोशी, सत्ताधारी गटनेते अॅड. हणमंत कोंगाली, सदस्य राजू भातकांडे, शाहिदखान पठाण यांच्यासह इतर सदस्य, महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. कौन्सिल सेक्रेटरींनी 13 जून रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवून त्याला मंजुरी देण्याची विनंती केली. त्यानुसार महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या प्रभाग क्र. 36 मधील चन्नम्मा उद्यान आणि बनशंकरी उद्यानमध्ये पथदीप, खांब व खराब झालेल्या युजी केबल बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेत कॉम्प्युटर, युपीएस, बॅटरी व वायरिंग काम करण्याला मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. 30 मध्ये येणाऱ्या नानावाडी गिंडे कॉलनीत वीजखांब घालणे, महापौरांच्या निधीतून विविध विकासकामे हाती घेणे, उत्तर विभागातील प्रभागात विद्युत खांब तसेच विविध तलाव व उद्यानांच्या आवारात हायमास्ट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.