यात्राकाळात सौंदत्ती येथे सेवासुविधा पुरवा
कोल्हापूर येथील भक्त मंडळाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : कोल्हापूर येथील हजारो भाविक सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या यात्रेसाठी दाखल होणार आहेत. 23 ते 26 डिसेंबर दरम्यान यात्रा होणार असून एसटी, खासगी वाहने, बसने भाविक डेंगरावर दाखल होतील. त्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनाने सौंदत्ती डोंगरावर भाविकांसाठी सर्व सेवासुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले. कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सौंदत्ती डोंगरावरील समस्या मांडल्या. कोल्हापूर येथील भाविकांची वाहने डोंगरापर्यंत सोडावीत, पार्किंग व इतर चार्जेस दर कमी करावेत, भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, भक्ती निवास तसेच टेंट परिसरात स्वच्छता ठेवावी, वीज व पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून द्यावी, मंदिर परिसरात देवीच्या पूजेचे थेट प्रक्षेपण करावे, महिला भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने महिला पोलीस तसेच महिला सुरक्षा रक्षक तैनात करावेत, यात्रा काळात मद्य व मांस विक्री बंद ठेवावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
सर्व सेवासुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन
यात्रा काळात कोल्हापूर येथील भाविकांना सर्व सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी दिले.यावेळी भक्त संघटनेचे अध्यक्ष युवराज मोळे, तानाजी चव्हाण, गजानन विभुते, सतीश डावरे, सुभाष जाधव, अच्युत साळुखे, मोहन साळुखे, आनंदराव पाटील, केशव माने यांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींचाही पुढाकार
दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक यल्लम्मा देवीच्या दर्शनाला येत असतात. परंतु जोगनभाव तसेच मंदिर परिसरात अस्वच्छता असल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त होते. त्यामुळे यावर्षी यात्रेपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे कोल्हापूरच्या भक्तांकडून स्वच्छतेची मागणी केली जात आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही पुढे सरसावले आहेत. माजी मंत्री सतेज पाटील यांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाशी संपर्क सांधून स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे यावर्षी तरी यात्रा काळात यल्लम्मा मंदिर परिसरात स्वच्छता ठेवली जाणार का? असा प्रश्न भाविकांतून विचारला जात आहे.