स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या
कर्नाटक राज्य स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघाची मागणी
बेळगाव : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबांना स्वातंत्र्यसैनिक कुटुंब म्हणून घोषित करावे. त्यांच्या मुलांना मासिक मानधन देण्यात यावे. तसेच शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये 5 टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी कर्नाटक राज्य स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेच्यावतीने शुक्रवारी राज्य सरकारकडे केली. सुवर्ण विधानसौध परिसरात आंदोलन करून आपल्या मागण्या राज्य सरकारसमोर मांडण्यात आल्या. केंद्र व राज्य सरकारने तात्काळ स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना ओळखपत्र तसेच वारसा हक्क प्रमाणपत्र द्यावीत. स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना सरकारी बसमधून मोफत प्रवासाची संधी द्यावी. सवलतीच्या दरात वीजपुरवठा करावा. यासह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांच्यासह बेळगाव व हावेरी येथील स्वातंत्र्यसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.