चलवेनहट्टी-हंदिगनूर मार्गावरील धाब्यावर बनावट दारूविक्री
दारू-जेवण एकाच ठिकाणी मिळत असल्याने गर्दी : संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : चलवेनहट्टी-हंदिगनूर मार्गावरील धाब्यामध्ये बनावट दारूविक्री राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे धाब्यामध्ये व बाहेर अनेक भांडणे होत आहेत आणि अनेक गैरव्यवहार सुरू आहेत. मात्र याकडे संबंधित काकती पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. यामागचे गौडबंगाल काय, असा संतापजनक प्रश्न ग्रामस्थांतून होत आहे. चलवेनहट्टी-हंदिगनूर या मुख्य रस्त्याच्या कडेला तीन वर्षांपूर्वी येथे मांसाहारी व शाकाहारी धाबे घालण्यात आले आहेत. या ठिकाणच्या बाहेरच्या कॅश काऊंटरमध्ये बनावट दारू ठेवली जाते व मागणीनुसार वाढीव दराने राजरोसपणे विक्री केली जाते.
तसेच धाब्यामध्ये देखील दारू पिण्यास परवानगी देतात व नियम धाब्यावर ठेवून रात्रभर मद्यपींसाठी धाबे सुरू ठेवले जातात. त्यामुळे या ठिकाणी दररोज मद्यपिंचा वावरदेखील वाढला आहे. दारू, जेवण एकाच ठिकाणी मिळत असल्याने मद्यपी ग्राहकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. धाब्यामुळे या परिसरातील अनेक तरुण नशेच्या आहारी गेले आहेत. आपली दिवसभराची कमाई या धाब्यामध्येच उडवत आहेत. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. धाब्यामध्ये दारू विकण्यास परवानगी कोणी दिली, असा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
मारामाऱ्यांचे केंद्रस्थान
या ठिकाणी दारू ढोसून आपापसात किंवा इतरांच्या बरोबर शिल्लक कारणावरून मारामाऱ्या देखील होतात व सोडवण्यास गेलेल्यानाही मारहाण करतात. म्हणून कोणी सोडवण्यास गेले नाही. रस्त्यावर येऊनच मद्यधुंद अवस्थेत मारामाऱ्या करून धिंगाणा घालतात. रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा उपद्रव सोसावा लागत आहे. तरी याकडे पोलीस व संबंधित खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
काकती पोलिसांचे साफ दुर्लक्ष
वारंवार या ठिकाणी अनेक गैरप्रकार घडत आहेत. राजरोसपणे धाब्यामध्ये गैरप्रकार घडत आहेत. या ठिकाणी दारू तेवढेच नव्हेतर गांजादेखील विकला जात आहे आहार खात्याचे नियम धाब्यावर ठेवण्यात आले आहे. किचनमध्ये स्वच्छता नसते पाण्यासाठी आरओ प्लांट नाही, ड्रममधील गढूळ पाणी पिण्यासाठी देण्यात येते. अशी परिस्थिती असतानाही काकती पोलीस याकडे दुर्लक्ष का करीत आहेत. मलिदा गीळून गप्प बसले आहेत की काय, असा प्रश्न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या धाब्यांचा परवाना रद्द करावा व धाबे मार्गावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांतून होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.