अधिवेशनासाठी पत्रकारांना दर्जेदार सुविधा द्या
आमदार दिनेश गुळीगौडा यांचे राज्य सरकारला पत्र
बेंगळूर : कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन बेळगावमध्ये होत आहे. येथे अधिवेशनाचे वृत्तांकन करण्यासाठी येणाऱ्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी उत्तम दर्जाचे जेवण, वास्तव्याची सोय आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करावे, अशी विनंती आमदार आणि गॅरंटी योजना अंमलबजावणी प्राधिकरणाचे उपाध्यक्ष दिनेश गुळीगौडा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार दिनेश गुळीगौडा यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहाचे सभापती व मुख्य सचिवांना पत्र पाठविले आहे. गेल्या 19 वर्षांपासून बेळगाव अधिवेशनासाठी बेंगळूरहून येणाऱ्या पत्रकारांना सामोरे जावे लागत आहे.
बेळगावमधील हवामान बेंगळूरपेक्षा वेगळे असल्याने अधिवेशनातील अनेक सत्रादरम्यान अनेक पत्रकार आजारी पडतात. यावर्षीच्या अधिवेशनात पत्रकारांसाठी स्वच्छ, रुचकर आहार, निवास, पाणी व तातडीच्या आरोग्य सुविधांसह चांगल्या दर्जाचे हॉटेल्स राखीव ठेवावेत. पत्रकारांच्या तक्रारी व सुविधांकडे लक्ष देण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त करावी, अशी विनंती त्यांनी पत्रामध्ये केले.