नगरसेवकांना 10 दिवसांत माहिती पुरवा
महापौर मंगेश पवार यांची सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : एखाद्या विषयावर सभेत बोलायचे असल्यास सर्वप्रथम त्याबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. मात्र माहिती देण्यासंदर्भात अर्ज करूनदेखील अधिकाऱ्यांकडून माहिती दिली जात नाही. 10 दिवसांत माहिती देण्यात यावी, असा ठराव यापूर्वीच पारित करण्यात आला आहे. पण त्याचे पालन होत नाही, असा आरोप नगरसेवक शाहिदखान पठाण यांनी केला. त्यामुळे एखाद्या नगरसेवकाने माहिती मागितल्यास दहा दिवसांत त्याची पूर्तता करावी, असा आदेश महापौर मंगेश पवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिला.
नगररचना विभागाकडे माहितीसाठी दोनवेळा अर्ज करण्यात आले. मात्र त्याबाबतची अर्धवट माहिती व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आली आहे. याबाबत खुलासा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आल्यानंतर नगररचना अधिकारी वाहिद अख्तर म्हणाले, नगरसेवकांनी गेल्या दोन वर्षांत किती बांधकामांना परवाने देण्यात आले आहेत, किती अर्ज आले आहेत, कोणाकोणाला नोटिसा बजाविल्या आहेत, यासह 11 विषयांबद्दल माहिती मागितली आहे. याला उत्तर देण्यास विलंब लागणार आहे. केवळ बांधकाम परवाना ऑनलाईन पद्धतीने दिला जातो. तर उर्वरित कामकाज लेखी स्वरुपात केले जाते, असे उत्तर दिले.
सर्वसाधारण बैठकीत काय ठराव पास होतात त्याचे सर्वप्रथम पालन करा, केएमसी अॅक्ट 64 नुसार माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली पाहिजे, याबाबतची माहिती कायदा सल्लागार अधिकाऱ्यांनी द्यावी, अशी मागणी केली. केवळ नगररचना विभागच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण विभागासह विविध विभागांकडून वेळेत माहिती दिली जात नाही, असा आरोप करण्यात आला. त्यावर नगरसेवकांनी विचारलेल्या माहितीला अधिकाऱ्यांनी दहा दिवसांत प्रतिसाद दिला पाहिजे, असे महापौर मंगेश पवार यांनी स्पष्ट केले.