दुष्काळ निवारणासाठी धारवाड जिल्ह्याला तात्काळ निधी द्या
शेतकऱ्यांची सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी
बेळगाव : राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, धारवाड जिल्ह्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सरकारने दुष्काळ निवारणासाठी धारवाड जिल्ह्याला 212 कोटी रुपये जारी करावेत, अशी मागणी रयत भारत रयत समाजातर्फे करण्यात आली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी विधानसौध परिसरातील आंदोलनस्थळी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध केला. धारवाड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीसाठी 212 कोटी तात्काळ देण्यात यावेत. शिवाय शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी भरलेल्या रकमेअंतर्गत पीकविमा देण्यात यावा. शिवाय पीएम किसान सन्मान योजना आणि राज्य सरकारकडून मिळणारे 4 हजार रुपये देण्यात यावेत. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणारे 4 हजार रुपये बंद झाले आहेत. त्यामुळे अडचणी वाढत आहेत. शिवाय दुष्काळी परिस्थितीत शेतातील थ्री-फेज वीजपुरवठा 12 तास करण्यात यावा. सातत्याने वीजकपात केली जात असल्याने पिके सुकून जाऊ लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत आणि नियमित करावा, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.