शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्या
उत्तर कर्नाटक आंदोलन समिती : कृषक समाजाची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : यंदा राज्यात मान्सून मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणी शेती शिवारात आले होते. परिणामी शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागल्याने शेतकरी हवालदिल झाले. शासनाने त्वरित नुकसानभरपाई जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी कृषक समाज व उत्तर कर्नाटक आंदोलन समितीच्यावतीने करण्यात आले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मात्र पाऊस झाल्याने दुबार पेरणीही वाया केली. हजारो एकर शेतजमिनीत शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, मूग, ऊस, जोंधळा, मका, कापूस, उडीद, भात आदींची पेरणी केली होती. मात्र सततच्या पावसामुळे शेत जमिनीत पाणी साचल्याने 50 हजार हेक्टरपेक्षा जास्त शेती पिके व 20 हजारहून अधिक हेक्टर बागायती पिके वाया गेली आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. यासाठी राज्य सरकारने नुकसान झालेल्या पिकांचा सर्व्हे करून भरपाई जाहीर करावी.
शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी
नैसर्गिक आपत्ती व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची घरे पूर्णपणे कोसळल्याने काही शेतकऱ्यांना आपली घरे गमवावी लागली आहेत. तसेच लहान मोठी पशुधनही मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली. राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी, तसेच दोन एकर शेतजमीन असलेल्या व 60 वर्षापेक्षा जास्त वयाच्या शेतकऱ्यांना दरमहा 5 हजार रुपयांचा भत्ता द्यावा, पंपसेटना दररोज 10 तास वीजपुरवठा करावा, केंद्र आणि राज्य सरकारने दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रती एकर 25 हजार रुपयांचे शेतकरी धन जमा करावे, आगामी गाळप हंगामासाठी 5 हजार रुपये प्रतिटन एफआरपी जाहीर करण्याची मागणीही करण्यात आली.