नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या
रत्न भारत रयत समाजातर्फे विधानसौध परिसरात आंदोलनाद्वारे मागणी
बेळगाव : मागील चार वर्षांत राज्यात ओल्या आणि सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. गतवर्षी सुक्या तर यंदा अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परिस्थिती शेतकऱ्यांना प्रति एकर 25 ते 50 हजार रुपयांपर्यंतची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रत्न भारत रयत समाजातर्फे करण्यात आली आहे. बुधवारी विधानसौध परिसरात आंदोलनकर्त्यांनी ही मागणी लावून धरली होती.
अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून कर्ज फेडणे अवघड बनले आहे. तर काही शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत कर्जबाजारी शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, त्याबरोबर शेतकऱ्यांना वीज जोडणी देव करून कृषी पंपांना दहा तास थ्री पेज वीजपुरवठा करावा, त्याबरोबर दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना नवीन घरे बांधून द्यावीत, अशी मागणीही आंदोलनकर्त्या शेकतऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्याला नैसर्गिक संकटांना सामोरे जात जीवन जगावे लागत आहे. मागील चार वर्षांत सुक्या आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे. शेतीतून म्हणावे तसे उत्पन्न मिळाले नसल्याने कर्ज फेडणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार म्हणून सरकारने तातडीने नुकसानभरपाई जारी करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.