बांधकाम कामगारांना शासकीय सुविधा पुरवा
कामगार खात्याला निवेदन : मागण्यांची पूर्तता लवकर न झाल्यास आंदोलनाचा इशारा
बेळगाव : असंघटित बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांची पूर्तता तातडीने करावी, अशी मागणी कामगार संघटनेतर्फे करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन शनिवारी कामगार खात्याला देण्यात आले आहे. शिवाय मागण्यांची पूर्तता लवकर न झाल्यास आंदोलनाचा इशाराही कामगारांनी दिला आहे. कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती, आरोग्य सुविधा, विवाह, अनुदान त्याबरोबर बेळगाव जिल्ह्यात कामागरांच्या सोयीसाठी बहुभाषिक ज्ञान असलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच कामगार सेवा केंद्र सुरू करावे. यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. बांधकाम कामागरांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती ठप्प झाली आहे. त्यामुळे कामागारांच्या मुलांना शैक्षणिक जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत. त्याबरोबर कामागारांच्या मुलांना विवाहासाठी मिळणार अनुदानही बंद झाले आहे. तातडीने मुलांच्या विवाहाला अनुदान देण्यात यावे. अशी मागणी कामगारांनी केली. जिल्ह्यात 2 लाख 6 हजार 96 इतकी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या आहे. मात्र अशा कामगारांना शासकीय सुविधा आणि अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन रखडलेल्या शासकीय सुविधा कामगारांना तातडीने पुरवून दिलासा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी अॅड. एन. आर. लातूर, राहुल पाटील, सुनील गावडे, रमेश काकतीकर, मनोहर हुंदरे यासह कामगार उपस्थित होते.