मागासवर्गीय वसती शाळेला सुविधा द्या
विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : दलित संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : मागासवर्गीय कल्याण खात्याच्या व्याप्तीत येणाऱ्या सुळगा येथील इंदिरा गांधी वसती शाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसुविधेमध्येच वास्तव्य करावे लागत आहे. सदर विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सुळगा (हिं) येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी इंदिरा गांधी वसती शाळा सुरू करण्यात आली आहे. मात्र या शाळेला मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार दिला जात नाही. त्यांच्या आरोग्याची दखल घेतली जात नाही. सरकारच्या नियमानुसार या सुविधा देणे आवश्यक आहे. त्या देण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक रोगराईंचा सामना करावा लागत आहे. वसती गृहातील वॉर्डनकडून दुर्लक्ष केल्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारकडून निधी येत नसल्यामुळे गैरसुविधा निर्माण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी
यामुळे तेथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक गैरसुविधांचा सामना करावा लागत आहे. जिल्हा प्रशासनाने याची तत्काळ दखल घेवून सदर विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.