नुकसानग्रस्त धनगरांना भरपाई द्या
तीन महिन्यात 150 शेळ्या-मेंढ्यांची चोरी : धनगर हतबल, संरक्षणाची मागणी
बेळगाव : मागील काही दिवसांमध्ये बेळगाव ग्रामीण भागात मेंढपाळांच्या बकऱ्यांच्या चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे धनगरांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. शिवाय मेंढपाळ करणेही धोक्याचे बनले आहे. नुकसानग्रस्त कुरबरांना भरपाई देऊन संरक्षण द्यावे, अशी मागणी बेळगाव तालुका कुरबर संघातर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. मागील तीन महिन्यांत 150 हून अधिक शेळ्या-मेंढ्यांची चोरी झाली आहे. त्यामुळे धनगर समाजाची अतोनात हानी झाली आहे. याबाबत पोलीस स्थानकातही तक्रार देण्यात आली आहे. मात्र पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. वाढत्या महागाईने मेंढपाळ व्यवसाय आधीच अडचणीत आणला आहे. त्यातच रात्रीच्यावेळी शेळ्या-मेंढ्यांची चोरी होत असल्याने धनगर हतबल झाले आहेत. चोरी झालेल्या धनगरांना भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.