For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येळ्ळूर-धामणे मार्गावर शेतकऱ्यांना बसथांबा द्या

11:07 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
येळ्ळूर धामणे मार्गावर शेतकऱ्यांना बसथांबा द्या
Advertisement

शेतकरी संघटनेची परिवहनकडे निवेदनाद्वारे मागणी 

Advertisement

बेळगाव : खरीप हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेताकडे वर्दळ वाढू लागली आहे. येळ्ळूर, धामणे आणि इतर रस्त्यांवर शेतकऱ्यांना बसथांबा द्यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटना-हरित सेना यांच्यावतीने परिवहनकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन परिवहनचे डीटीओ के. के. लमाणी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.येळ्ळूर, धामणे, शहापूर, अनगोळ परिसरातील शेतकऱ्यांची धामणे, येळ्ळूर रस्त्याशेजारी शेती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ये-जा असते. सध्या शिवारातील कामाची धांदल सुरू आहे. त्यामुळे शेतकरी महिला आणि शेतकऱ्यांना बस थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेषत: शेतकरी महिलांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर बस थांबविल्या जाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास सुरू असला तरी बस चालक आणि वाहकांकडून मनमानी सुरू झाली आहे. शेतकरी महिलांना बस थांबविली जात नसल्याने पायपीट करण्याची वेळ येत आहे.काही बस वाहकांकडून महिला शेतकऱ्यांना बसमधून खाली उतरविले जात आहे. अशा बस चालक आणि वाहकांना समज द्यावी, अशी मागणीही महिला शेतकऱ्यांनी केली आहे.गतवर्षी देखील महिला शेतकऱ्यांना बससेवेविना मोठा त्रास झाला होता. दरम्यान परिवहनच्या अधिकाऱ्यांनी बसथांबा दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र पुन्हा बस वाहक आणि चालकांकडून मनमानी केली जात आहे. महिला शेतकऱ्यांना बस थांबविली जात नसल्याचे कुचंबना होऊ लागली आहे. त्यामुळे महिला शेतकरीही आक्रमक झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत धामणे, येळ्ळूर मार्गावर शेतकऱ्यांसाठी बस थांबविली गेली नसल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे रमाकांत कोंडुस्कर, शेतकरी नेते राजू मरवे यासह शेतकरी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.