For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कृष्णा नदीकाठावर 24 तास थ्रीफेज वीजपुरवठा करा

10:25 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
कृष्णा नदीकाठावर 24 तास थ्रीफेज वीजपुरवठा करा
Advertisement

बेळगाव : चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदी काठाच्या प्रदेशात दररोज एक तास थ्रीफेज वीजपुरवठ्याचा आदेश देण्यात आला असून सदर आदेश रद्द करण्यात यावा. नागरिकांच्या सोयीसाठी व जनावरांच्या संगोपनासाठी 24 तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. कृष्णा पाणी उपसा पाणी वापरकर्ते संघ अरब्यानवाडी (केरूर) ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.  कृष्णा नदी काठाच्या प्रदेशात येणाऱ्या कल्लोळ्ळी, मांजरी गावांमधील शेतकऱ्यांना जारी करण्यात आलेला आदेश मारक ठरत आहे. जिल्हा प्रशासनाकडून या भागामध्ये दररोज एक तासच थ्रीफेज वीजपुरवठा करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. यामुळे दुष्काळ परिस्थितीत नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वीजपुरवठा केला जात नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. केरूर ग्रा. पं. च्या व्याप्तीत येणाऱ्या केरूर गावासह केरूरवाडी, अरब्यानवाडी, रुपिनाळ, हिरेकुडी सदर गावांमधील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. 12 ते 16 हजार नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाणी मिळत नसल्याने भटकंती करावी लागत आहे. यासाठी या भागामध्ये सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास ग्रामस्थांवर स्थलांतर होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. पिकांना पाणी मिळत नसल्याने पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही. याची दखल घेऊन प्रशासनाने वीजपुरवठ्या संदर्भात जारी करण्यात आलेला आदेश रद्द करण्यात यावा. कल्लोळ्ळी व मांजरी नदी परिसरातील गावांना 24 तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणीही संघटनेकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसेच उमराणी, बंबलवाड, कुंगटोळी, बेळकूड या गावांनाही 24 तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.