सरकारी गृहनिर्माण योजनांमध्ये 2 टक्के आरक्षण द्या
मंत्री हेब्बाळकर यांना तृतियपंथियांचे निवेदन
बेळगाव : तृतियपंथियांना राज्य सरकारने सरकारी गृहनिर्माण योजनेमध्ये 2 टक्के आरक्षण द्यावे, यासह तृतियपंथियांची जनगणना करावी, अशी मागणी बेळगाव जिल्ह्यातील तृतियपंथियांच्यावतीने महिला व बालकल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली. नुकतीच महिला व बालकल्याण मंत्र्यांची भेट घेऊन तृतियपंथियांनी आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या. राज्य सरकारला व्यक्ती, प्राणी, पक्ष्यांचीही संख्या माहिती आहे. परंतु, तृतियपंथियांची संख्या माहिती नाही. यामुळे तृतियपंथियांवर अन्याय होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनगणना करून त्यांची संख्या जाहीर करावी. महिला विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची इतरत्र बदली करू नये, यासह इतर मागण्या करण्यात आल्या. मंत्री हेब्बाळकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.