‘त्या’ प्राध्यापकावर कारवाईसाठी निदर्शने
कारवार : महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा छळ करणाऱ्या त्या प्राध्यापकावरील कारवाईच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जोरदार निदर्शने आणि महाविद्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. ही घटना अंकोला तालुक्यातील पुजगेरी येथील सरकारी पदवी महाविद्यालयात घडली. विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोप होत असलेल्या प्राध्यापकाचे नाव रामकृष्ण अंकोलेकर असे आहे. या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, प्रा.अंकोलेकर हे महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला अश्लिल मेसेज पाठवून छळ करीत आहेत. छळाला वैतागलेल्या विद्यार्थिनीने प्राध्यापकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तरीसुद्धा अद्याप प्राध्यापकावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आणि शेकडो पालकांनी जोरदार निदर्शने केली व महाविद्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी त्या प्राध्यापकाला सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली. शिवाय प्राध्यापकाला समर्थन देणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बदली करावी, अशी मागणी केली. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी महाविद्यालयाच्या एस.डी.एम.सी. पदाधिकाऱ्यांना आणि सदस्यांना महाविद्यालय स्थळी दाखल होण्याची मागणी केली. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.