For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्य सचिवांच्या विरोधात निदर्शने

11:21 AM Sep 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुख्य सचिवांच्या विरोधात निदर्शने
Advertisement

सचिवालयाच्या प्रवेशद्वारावरच रोखले काँग्रेस कार्यकर्त्यांना : प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी

Advertisement

पणजी : बेकायदा जमीन प्रकरणात खुद्द राज्याचे मुख्य सचिव गुंतलेले असताना त्यांना ते कृत्य करण्यास अडविण्यापेक्षा आम्हाला का म्हणून अडवता, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांनी विचारूनही काँग्रेस नेत्यांची अडवणूक काल बुधवारी पोलिसांनी केली. मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांना घेराव घालण्यासाठी काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी काल सचिवालयात धडक दिली. परंतु त्यांना अडविण्यात आले. त्यानंतर घोषणाबाजी करीत जमीन खरेदी प्रकरणाचा व बेकायदा जमीन ऊपांतरप्रकरणी मुख्य सचिव गोयल यांचा काँग्रेस नेत्यांनी निषेध केला.

हळदोणा जमीन खरेदी प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांना घेराव घालण्यासाठी पर्वरीत गेलेल्या शिष्टमंडळाला पोलिसांनी विधानसभा संकुलाच्या प्रवेशद्वारावरच अडविले. त्यानंतर त्यांनी मुख्य सचिव गोयल यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस व काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली. गोयल यांना जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, प्रसिद्धी प्रमुख अमरनाथ पणजीकर, आमदार कार्लुस फेरेरा व सुमारे 50 हून अधिक कार्यकर्ते होते.

Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी लक्ष घालून या प्रकरणाचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणी निदर्शकांनी केली आहे. यावेळी सचिवालयाला जणू पोलीस छावणीचे स्वऊप आले होते. निदर्शने करणारे काँग्रेस कार्यकर्ते 50 जण तर बंदोबस्तासाठी सुमारे 150 पोलीस तैनात करण्यात आले होते. काँग्रेस नेत्यांनी पोलिसांवर प्रश्नाचा भडीमार केला. ‘जब जब सीएम डरता है, तब तब पुलीस को आगे करता है।’, ‘लॅण्ड ग्रेबर बिजेपी, दार उघड दार उघड, जमीन खाऊ बिजेपी, दार उघड, दार उघड’ सीएस बाबा, सीएस बाबा बेगीन यो बेगीन यो’, ‘गोंय विकले, जमनी विकल्यो, गोंय लुटले’ अशा घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी देत निषेध केला.

कोणत्या कायद्याच्या आधारे अडवले?

गोव्यातील शेतजमिनीचे बेकायदा ऊपांतर करून पुनीतकुमार गोयल यांनी जमिनीचे व्यवहार केल्याने गोव्यातील जमिनी आता मुख्य व्यक्तीच गिळंकृत करीत आहे. तरीही आम्हाला गोव्याचे मंदिर असलेल्या सचिवालयाचा दरवाजा (गेट) बंद करून कोणत्या कायद्याच्या आधारे अडवले जात आहे, असे अमित पाटकर यांनी पोलिस अधिकाऱ्यांना विचारले.

Advertisement
Tags :

.