बिदरमध्येही काळ्यादिनानिमित्त निषेध फेरी
प्रतिनिधी/ बेळगाव
केवळ बेळगावच नव्हे तर बिदर जिल्ह्यामध्येही महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने काळादिन पाळण्यात आला. बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यात ठिकठिकाणी निषेध फेरी काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाले होते.
भाषावार प्रांतरचनेनंतर बेळगावसह कारवार व बिदर जिल्ह्यातील काही गावे कानडी प्रांताला जोडण्यात आली. त्यामुळे बेळगावबरोबरच बिदर जिल्ह्यातही नागरिकांचा भाषेसाठीचा संघर्ष सुरूच आहे. दरवर्षी बेळगावबरोबरच तेथेही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले जाते. शुक्रवारी बोंथी, ता. औराद येथे काळ्यादिनानिमित्त निषेध फेरी काढण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष रामराव राठोड, पृथ्वीराज पाटील, डॉ. संजय मुळे, अॅड. भास्कर कुलकर्णी, प्रा. देविदास पाटील, जीवनराव शिंदे, विठ्ठलराव पाटील, दिलीप पाटील, दिनेश मुधळे, रामराव चितगिरे, भगवंत कोंडे, अॅड. रमेश बिरादार यासह इतर उपस्थित होते.