शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 12 डिसेंबरला आंदोलन
राज्य रयत संघ, हसिरू सेना, शेतकरी क्षेमाभिवृद्धी संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून ते सर्वांचे अन्नदाते आहेत. मात्र शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून राज्य सरकार त्यांच्या समस्यांचे निवारण करण्याकडे कानाडोळा करत आहे. दरम्यान, बेळगावमध्ये लवकरच राज्य सरकारचे अधिवेशन होणार असून या काळात शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याची एक संधी समोर आली आहे. राज्य सरकारशी थेट संपर्क साधता येणार असून शुक्रवार 12 रोजी आंदोलन करणार असून यासाठी आपल्याला परवानगी देण्याची मागणी राज्य रयत संघ, हसिरू सेना व शेतकरी क्षेमाभिवृद्धी संघाच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. तसेच ऊसबिल, वीज समस्या, सिंचन समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे या समस्या त्वरित निकाली काढण्यात याव्यात. त्याचबरोबर उचगाव व अतिवाड येथे शेतकऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले असून काहीजण दादागिरी करत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून याकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांसह विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. तसेच शेतकऱ्यांनी केलेली दुबार पेरणीही वाया गेल्याने त्यांच्यावर दुहेरी संकट ओढवले. राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली असली तरी अद्याप शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या खात्यात लवकरात लवकर नुकसानभरपाई जमा करण्यात यावी, आदी मागण्या करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.