For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तलाठी संघाचे आंदोलन

11:56 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तलाठी संघाचे आंदोलन
Advertisement

कामाचा बोजा वाढत असल्याची तक्रार : विविध मागण्यांचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : तलाठ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा लादला जात आहे. महसूलसंबंधित कामांसोबतच पिकांचे सर्वेक्षण त्याचबरोबर इतर योजनांची जबाबदारीही तलाठ्यांवर टाकली जात असल्यामुळे कामाचा बोजा वाढला आहे. त्यामानाने तलाठी पदासाठी सुविधा दिल्या जात नसल्याने शुक्रवारी बेळगाव जिल्ह्यातील तलाठ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्व तलाठी व तत्सम पदावरील अधिकारी सहभागी झाले होते. गावांची लोकसंख्या वाढली तरी अद्यापही एकच तलाठी नेमणूक केला जात आहे. तलाठ्यांना स्वत:चा मोबाईल, नेटपॅक वापरून सरकारची कामे करावी लागत आहेत. महसुलासंबंधीत एकूण सोळा अॅपद्वारे काम करावे लागते. याबरोबरच इतर जबाबदाऱ्याही लादल्या जात आहेत. बऱ्याच वेळा सुटी दिवशीही कामे दिली जात असल्यामुळे तलाठी पदाच्या कर्मचाऱ्यांवरील बोजा वाढला आहे.

राज्य सरकारने तलाठ्यांकडील अतिरिक्त कामे कमी करून त्यांना स्वतंत्र कार्यालय, चांगल्या दर्जाचा मोबाईल, लॅपटॉप, प्रिंटर व स्कॅनर तसेच वेतनवाढ व सेवाज्येष्ठतेनुसार बढती देण्यात यावी, सध्या प्रवासी भत्ता केवळ 500 रुपये दिला जातो. तो 3 हजार रुपये करावा, घरांच्या नुकसानीबाबतच्या सर्व्हेच्या जबाबदारीतून तलाठ्यांना मुक्त करावे, तीन वर्षांच्या सेवेनंतर आंतरजिल्हा बदलीसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत, यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडप घालून महिला तसेच पुरुष तलाठ्यांनी जोरदार आंदोलन केले. जोवर मागण्या मान्य होणार नाहीत तोवर माघार घेणार नाही, असा पवित्रा तलाठी संघाने घेतला आहे. मागण्या मान्य कराव्यात, अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून निघाला होता. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांना निवेदन देण्यात आले.

Advertisement

तलाठी कार्यालयांमध्ये शुकशुकाट

कर्नाटक राज्य ग्राम प्रशासकीय अधिकारी मध्यवर्ती संघाच्यावतीने संपूर्ण राज्यभर आंदोलन केले जात आहे. गुरुवारपासून या आंदोलनाला सुरुवात झाली. शुक्रवारीही तलाठ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने तलाठी कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. बेळगाव जिल्ह्यातील 650 तलाठ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

Advertisement
Tags :

.