विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पीडीओ संघटनेचे जिल्हा पंचायत समोर आंदोलन
पीडीओ पदाच्या अधिकाऱ्यांना ‘क’ ऐवजी ‘ब’ श्रेणीत स्थान देण्याची मागणी
बेळगाव : पंचायत विकास अधिकारी (पीडीओ) या पदावरील कर्मचाऱ्यांना ‘क’ ऐवजी ‘ब’ श्रेणीत स्थान द्यावे, या प्रमुख मागणीसह जिल्ह्यातील पीडीओ संघटनेने सोमवारपासून आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी बेळगावच्या जिल्हा पंचायत कार्यालयासमोर जिल्ह्यातील पीडीओंनी एकत्रित येत जोरदार आंदोलन छेडले. यामुळे जिल्हा पंचायत कार्यालयासमोर पीडीओंची मोठी गर्दी झाली होती.
गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढत असताना एकाच पीडीओवर संपूर्ण जबाबदारी दिली जात आहे. एकीकडे कामाचा बोजा वाढत असला तरी इतर कर्मचारी मात्र तितकेच आहेत. त्यामुळे ग्राम पंचायतींना सचिव, लेखा साहाय्यक व ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबरोबरच तांत्रिक कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढवावी, सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, पोलीस विभागाच्या धर्तीवर प्राधिकाराला अधिकार द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
पीडीओ पदाच्या अधिकाऱ्यांना सध्या ‘क’ श्रेणीत गणले जाते. पीडीओ हे गावाचे प्रमुख अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने पीडीओ पदाच्या अधिकाऱ्यांना ‘ब’ श्रेणीत स्थान दिल्यास त्यांच्या वेतनात वाढ होण्यासोबत त्यांच्या दर्जातही वाढ होईल, अशी मागणी करण्यात आली. सुरुवातीचे काही दिवस बेंगळूरमध्ये आंदोलन छेडल्यानंतर आता बेळगावमध्येही आंदोलन सुरू केले आहे. बेळगाव जिल्ह्यातील पीडीओ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.