मणदूर प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन ४९ व्या दिवशी स्थगित
वारणावती :
मणदुर (ता. शिराळा) हुतात्मा स्मारक येथे चांदोली अभयारण्यग्रस्तांचे गेले ४९ दिवसांपासून आंदोलन सुरू होते. सरकारच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्हयातील चांदोली अभयारण्यासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून तातडीने प्रस्ताव तयार करून मंत्रिमंडळांच्या मंजुरीसाठी पाठवावे, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वनमंत्री गणेश नाईक यांनी काल झालेल्या बैठकीत दिले आहेत. चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या अभयारण्य पुनर्वसन संदर्भातील प्रलंबित बाबीसंदर्भात महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, शाहुवाडी- पन्हाळा विधानसभा आमदार विनय कोरे, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी भारत पाटणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चांदोली अभयारण्यात जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी, वन विभागाचे अधिकारी तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी यांची समिती स्थापन करून या समितीने अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एक महिन्यात मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आणावा असे निर्देश देण्यात आले. आंदोलनाच्या ४९ व्या दिवशी आंदोलनस्थळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत कोल्हापूर वनविभागाचे उपसंचालक जी. गुरुप्रसाद यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ताबडतोब प्रयत्न केले जातील. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल सादर करण्यासाठी वनविभाकडून कार्यवाडी केली जाईल असे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. डॉ. भारत पाटणकर यांनी मार्गदर्शन करत मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुंन्हा आंदोलन करण्याचा इशारा देत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे सांगितले.