भारतीय किसान संघाचे 10 रोजी आंदोलन
बेळगाव : शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर त्वरित तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आगामी हिवाळी अधिवेशनावेळी बुधवार दि. 10 रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी होणार असून सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा. तसेच त्वरित पीक नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी भारतीय किसान संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. सर्व पिकांसाठी आधारभूत किंमत खरेदी केंद्र सुरू करून खरेदीचे नियम शिथिल करण्यात यावेत. पीक विमाबाबत शेतकऱ्यांना होणाऱ्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, साखर कारखान्यातील वजन काटे पादर्शक बनवावेत. शेतकऱ्यांच्या कूपनलिकांना वीजपुरवठा करण्यात यावा, समस्याग्रस्त विजेचे खांब व वीजवाहिन्यांची त्वरित दुरुस्ती करावी, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे बिल 15 दिवसांत अदा करावे, थकीत बिल राहिल्यास 15 टक्के व्याजदराने बिल देण्यात यावे, शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा वेळेवर पुरवठा करावा आदी विविध मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.