जुनी पेन्शन योजनेसाठी उद्या पुण्यात धरणे आंदोलन
अंशतः अनुदान प्राप्त (२००५ पूर्वी) शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा इशारा
ओटवणे प्रतिनिधी
सन २००५ पूर्वी अंशतः अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हक्कांची १९८२ जुनी पेन्शन योजना अद्याप मान्य न झाल्याने शुक्रवार ७ जानेवारी रोजी पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात जिल्हयातील संबधित पिडीत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदान प्राप्त (२००५ पूर्वी) शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर, राज्य कार्यकारणी सदस्य तथा सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक शरद चोडणकर आणि सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष प्रदीप देसाई यांनी केले आहे.अंशतः अनुदान प्राप्त २००५ पूर्वी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची शासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. तसेच यापूर्वी माजी मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षण आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली एक नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः अनुदान प्राप्त असणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन लागू करण्याकरिता समिती गठीत केली होती. याचाही अहवाल अद्याप प्रलंबित असून न्याय मागण्याबाबत कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आली नाही. तसेच एक नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या मोठी नाही. मात्र हे सर्व न्याय हक्काच्या लाभापासून वंचित आहेत. नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू केली आहे. त्याच आधारे खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करून शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा अन्यथा मयत कर्मचारी यांचे कुटुंबीय सेवानिवृत्त शिक्षक बांधव शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ७ जानेवारी रोजी आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील पेन्शन पिडीत असणारे बहुतांशी शिक्षक शिक्षकेतर बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती अंशतः अनुदान प्राप्त (२००५ पूर्वी) शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक शरद चोडणकर जिल्हाध्यक्ष प्रदीप देसाई यांनी दिली आहे.