राज्य सरकार विरोधात कृष्णा नदीत आंदोलन
आलमट्टीचे पाणी तेलंगणाला न देण्याची मागणी
वार्ताहर/विजापूर
आलमट्टी-लालबहादूर शास्त्राr जलाशयातून तेलंगणा राज्याच्या रंगारेड्डी जिह्यातील जुराल धरणाकडे पाणी सोडल्याच्या निर्णयाचा निषेध करत विजापूरमध्ये मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. यानंतर आलमट्टीच्या कृष्णा नदी किनाऱ्यावर श्रद्धांजली व पिंड प्रदान कार्यक्रम करून राज्य सरकारचा निषेध केला. यानंतर अखंड कर्नाटक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नदीत आंदोलन करत राज्य सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी शेतकरी नेते अरविंद कुलकर्णी यांनी, शेतकऱ्यांवर अन्याय करणारे राज्य सरकार तेलंगणा राज्याला सतत पाणी सोडून आलमट्टी जलाशयातील पाणी पूर्णपणे रिकामे करण्याच्या तयारीत आहे. तेलंगणाला केवळ 1.27 टीएमसी पाणी सोडले आहे असे खोटे सांगताना आतापर्यंत 10 टीएमसी पेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले आहे, अशा वार्ता माध्यमातून प्रकाशित झाल्या आहेत. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे दुसऱ्या जिह्यातील शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारला जागे करून तेलंगणाला दिले जाणारे पाणी त्वरित थांबवायला हवे. अन्यथा दुसऱ्या जिह्यातील शेतकरी राज्य सरकारविरोधात संघर्ष उभारतील, असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला.