कणेरी मठाधीशांविरोधात आज बेळगावात आंदोलन
लिंगायत मठाधीशांवरील टीकेनंतर संघटना आक्रमक
बेळगाव : बसवतत्त्वांचा पुरस्कार करणाऱ्या लिंगायत मठाधीशांवर टीका करणाऱ्या कणेरी मठाच्या स्वामीजींविरुद्ध बेळगावसह कर्नाटकात लिंगायत संघटनांनी आंदोलन तीव्र केले आहे. शुक्रवार दि. 17 ऑक्टोबर रोजी बेळगाव येथेही निदर्शने करण्यात येणार आहेत. लिंगायत महासभेचे अध्यक्ष बसवराज रोट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसवधर्माचे पालन व पुरस्कार करणाऱ्या संघटनांकडून निदर्शने करण्यात येणार आहेत. केवळ बेळगावच नव्हेतर संपूर्ण राज्यात कणेरी मठाधीशांविरुद्ध आंदोलन सुरू झाले आहे. या बैठकीत मुरग्याप्पा बाळी, इराण्णा देयण्णावर, मुरगेश शिवपुजी, सतीश चौगला, प्रवीण चिकली आदींसह लिंगायत महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते. कर्नाटकात लिंगायत मठाधीशांकडून बसवसंस्कृती अभियान चालविण्यात आले होते.
एक महिन्याच्या अभियानानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत बेंगळूर येथे या अभियानाची सांगता झाली. बसवसंस्कृती अभियानात कर्नाटकातील सुमारे 300 हून अधिक मठाधीशांनी भाग घेतला होता. जत तालुक्यातील बिळूर येथे झालेल्या कार्यक्रमात कणेरी मठाचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी लिंगायत मठाधीशांवर टीका केली होती. ‘मुख्यमंत्री कृपापोषित नाट्या संघ’ अशा शब्दात त्यांचे वर्णन केले होते. टीका करण्याच्या भरात स्वामीजींच्या तोंडी काही अपशब्दही बाहेर पडले होते. त्यामुळेच कर्नाटकात स्वामीजींविरुद्ध आंदोलन सुरू झाली आहेत. विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी येथे 16 व 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात कणेरी मठाधीश भाग घेणार होते. त्यांच्याविरुद्ध सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विजापूरचे जिल्हाधिकारी डॉ. आनंद के. यांनी विजापूर जिल्ह्यात त्यांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे. या कार्यक्रमात स्वामीजींनी भाग घेतला तर अप्रिय घटना घडू शकतात, कायदा व सुव्यवस्था परिस्थितीला धक्का पोहोचू शकतो, असा अहवाल पोलीस दलाने दिल्यामुळे त्यांना विजापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी घालण्यात आली असून बेळगावातही शुक्रवारी आंदोलन होणार आहे.