तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्यासाठी आंदोलन
सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग, रस्त्यासाठी काढली निविदा
बेळगाव : टिळकवाडी येथील तिसरे रेल्वेगेट उड्डाणपुलावरील रस्त्याची वाताहत झाली असल्याने सोमवारी काही नागरिकांनी आंदोलन केले. रस्त्याची दुरुस्ती न केल्यास हटणार नाही, असा इशारा देताच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी काढलेल्या निविदेची प्रत आंदोलकांच्या हाती दिली. येत्या आठ दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून लगेचच डांबरीकरण केले जाणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. उड्डाणपुलावरील रस्त्यावर यंदाच्या पावसाळ्यात मोठे खड्डे पडले. गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची डागडुजी करण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु, मुसळधार पावसामुळे डागडुजी करता येत नसल्याचे कारण देण्यात आले. दोन महिने उलटले तरी डांबरीकरण न झाल्याने अखेर सोमवारी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळी 10.30 वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली. उड्डाणपुलाजवळच ठिय्या मारून आंदोलकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. दुपारी 1 वाजता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. तसेच रस्त्यासाठी करण्यात आलेल्या निविदेची प्रत गुंजटकर यांना देण्यात आली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. उड्डाणपुलावरील रस्त्यासाठी विनायक गुंजटकर यांनी चार ते पाचवेळा आंदोलन केले होते. तसेच जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, खासदार जगदीश शेट्टर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदनेही दिली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आल्याचे दिसून आले. आंदोलनावेळी राजू बडमंजी, गजानन चौगुले, राजकुमार बोकडे, संदीप इंगळे, राजश्री पवार, परशराम बाबले, निशांत सुतार, बी. के. सावंत यांसह इतर सदस्य उपस्थित होते.
मुलाच्या अपघातामुळे 30 ते 40 हजार रुपये खर्च
रेल्वेगेट उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे मुलाचा अपघात झाला. या अपघातामुळे 30 ते 40 हजार रुपये खर्च करावा लागला. त्याचबरोबर मागील पंधरा दिवसांपासून तो घरामध्ये आहे. त्यामुळे असे प्रकार कोणा इतरांसोबत होण्यापूर्वी प्रशासनाने या रस्त्याचे डांबरीकरण करावे.
- केच्चण्णा
दिवाळी आली तरी रस्ताकाम नाही
शहरातून औद्योगिक वसाहतीला जाण्यासाठीचा तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल महत्त्वाचा ठरतो. परंतु, सध्या पडलेल्या खड्ड्यांमुळे तारेवरची कसरत करत ये-जा करावी लागत आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची डागडुजी केली जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, गणेशोत्सव झाला, नवरात्र झाली, आता दिवाळी आली तरी रस्ता करण्यात आलेला नाही.
- विशाल भिसे
प्रशासनाचे लक्ष नसल्यामुळे कामगारवर्ग वैतागला
औद्योगिक वसाहतीतील दररोज 10 ते 15 हजार कामगार या रस्त्यावरून ये-जा करतात. रस्त्यामध्ये तब्बल फूटभर खड्डे पडल्यामुळे वाहने चालविणे अवघड झाले आहे. प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्यामुळे कामगारवर्ग वैतागला असून या आंदोलनाला मायक्रो इंडस्ट्रीज असोसिएशनचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
- राजू वर्पे